बँकॉक : भारताचे आघाडीचे बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल व किदाम्बी श्रीकांत यांना थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आपल्या दुसर्या फेरीतील सामन्यांमध्ये पराभूत व्हावे लागले. त्यामुळे स्पर्धेतील त्यांचे आव्हान आता संपुष्टात आले आहे. सायनाला जपानच्या बिनमानांकित सयाका ताकाहाशीकडून तर, श्रीकांतला स्थानिक खेळाडू खोसित फेतप्रदब याच्याकडून पराभूत व्हावे लागले. सातव्या मानांकित सायनाने गेल्या दोन स्पर्धांमध्ये दुखापतीमुळे सहभाग नोंदवला नव्हता. त्यामुळे या स्पर्धेत तिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, ताकाहाशीविरुद्ध झालेल्या सामन्यात तिला 48 मिनिटे चाललेल्या सामन्यात 16-21, 21-11, 21-14 असे पराभूत केले. ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूच्या अनुपस्थितीत सायनावर भारताची मदार होती; पण ती पराभूत झाल्याने महिला एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. पुरुष एकेरीत श्रीकांतला खोसित विरुद्ध 21-11, 16-21, 12-21 असे पराभूत व्हावे लागले. पहिला गेम 21-11 असा जिंकत श्रीकांतने सामन्यात चांगली सुरुवात केली; पण पुढच्या दोन्ही गेममध्ये श्रीकांतला चमक दाखवता आली नाही व त्याला पराभवाचा सामना करावा लागला. पारुपल्ली कश्यपलादेखील चीन तैपेईच्या तिसर्या मानांकित चाऊ टीएन शेनकडून 21-9, 21-14 असे सरळ गेममध्ये पराभूत व्हावे लागले; पण बी. साई प्रणितने भारताच्याच शुभंकर डे याला 21-18, 21-19 असे सरळ गेममध्ये नमवित पुढची फेरी गाठली. पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रनकीरेड्डी व चिराग शेट्टी जोडीने इंडोनेशियाच्या फजर अलफिया व मोहम्मद रियान आर्दियांतो जोडीला 21-17, 21-19 असे नमविले. भारतीय जोडीचा सामना आता पुढच्या फेरीत कोरियाच्या चोई सोलग्यु व सियो सेयुंग जाए या क्वालिफायर जोडीशी होणार आहे. मिश्र दुहेरीत प्रणव चोप्रा व एन. सिक्की रेड्डी जोडीला हाँगकाँगच्या टँग चुन मान व से यिंग सुएट जोडीकडून 21-16, 21-11 अशा पराभवाचा सामना करावा लागला.
