चौपदरीकरणातील जमिनीच्या मोबदल्यापासून वंचित लोटे घाणेखुंटमधील शेतकऱ्यांचा प्रजासत्ताकदिनी उपोषणाचा इशारा

0

लोटे : लोटे घाणेखुंटमधील जमीन मालक शेतकरी जमिनीचा मोबदला न मिळाल्यानं आक्रमक झाले आहेत. घाणेखुंट येथील महामार्ग चौपदरीकरणादरम्यान संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला अद्यापही काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही.

या जमिनींच्या सातबाऱ्यावर इतर हक्कांमध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचं नाव असल्यानं सदर शेतकऱ्यांना मोबदला अद्यापही मिळालेला नाही. परिणामी हे शेतकरी आक्रमक झाले असून प्रजासत्ताक दिनी उपोषणास बसणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या चौपदरी करणासाठी लोटे घाणेखुंट गावातील शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्याकरिता सक्षम प्राधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी खेड यांची नेमणूक करण्यात आली होती. याप्रमाणे 3 मे 2017 रोजी मोबदला अदा करण्याकरता संबंधित शेतकऱ्यांना सदरची नोटीस दिली. ही नोटीस मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आलेल्या नोटीशीप्रमाणे मोबदला मिळण्यासाठी लागणारी कागदपत्रं सादर केली. काही शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर इतर हक्कांमध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचं नाव असल्यामुळं या शेतकऱ्यांना मोबदला अदा करण्यास नकार देण्यात आला. परंतु काही शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावर इतर हक्कांमध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचं नाव असतानाही त्यांना मोबदला अदा करण्यात आला. वंचित शेतकरी इतर हक्कांमध्ये असलेले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं नाव कमी करण्याकरिता महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयामध्ये गेले तीन वर्षे फेऱ्या मारीत आहेत. मात्र संबंधित कार्यालयाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. याविषयी खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी आणि संबंधित मोबदल्यापासून वंचित शेतकऱ्यांची संयुक्त बैठक होऊन प्रादेशिक अधिकारी रत्नागिरी यांनी प्रस्ताव सादर करून नोंद कमी करून घेण्याचं ठरलं. परंतु या घटनेला दोन वर्ष झाली.

गतवर्षी 3 फेब्रुवारी 2019 रोजी सदर जमिनींचा मोबदला मिळण्यासाठी लोटे येथील सी.ई.टी.पी समोर तेथील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. प्रादेशिक अधिकारी रत्नागिरी यांनी 23 एप्रिल 2021 रोजी जन आंदोलन करू नये, अशी विनंती केल्यावरून या ग्रामस्थांनी आंदोलन तूर्तास स्थगित केलं. या गोष्टीलाही दहा महिने उलटून गेली. तरीही अद्याप आम्हाला महामार्गासाठी संपादित केलेल्या आमच्या वडिलोपार्जित जमिनींचा मोबदला अदा करण्यात आला नाही, असं या शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलं.

‘आमची अशी मागणी आहे की, काही शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर इतर हक्कांमध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे नाव असतानाही मोबदला अदा करण्यात आला आहे. त्याप्रमाणे आम्हालाही आमच्या जमिनींचा मोबदला अदा करावा आणि आमच्यावर झालेला अन्याय दूर करावा. अन्यथा आम्ही सर्व पीडित शेतकरी आमच्या कुटुंबासह उपविभागीय अधिकारी खेड यांच्या कार्यालयासमोर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी कोरोना नियमांचे पालन करून उपोषणास बसणार आहोत, असा इशारा या शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. वेळ पडल्यास एमआयडीसीचा सी.ई.टी.पी.(कॉमन इम्प्लुमेंट ट्रिटमेंट प्लॅंट) बंद करु, असा इशारा लोटेमधील सरपंच चंद्रकांत चाळके यांनी दिला आहे.

दरम्यान, लोटे घाणेकुंट, कोतवली या गावामध्ये एमआयडीसीची जी जल वाहिनी आहे. त्या जलवाहिनी खाली शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे. त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी 26 ला जनआंदोलन छेडलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी योग्य तो न्याय न मिळाल्यास वेळ पडल्यास एमआयडीसीचा सी.ई.टी.पी (कॉमन इम्प्लुमेंट ट्रिटमेंट प्लॅंट) बंद करु, असा इशारा त्यांच्या वतीनं दिला जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED

(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:29 AM 24-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here