महाआघाडी शासनाची मानसिकता बेपर्वा सरंजामशाहीसारखी : अॅड. दीपक पटवर्धन

0

रत्नागिरी : महाआघाडी शासनाची मानसिकता बेपर्वा सरंजामशाहीसारखी झाली आहे, अशी टीका भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.

ते म्हणाले, शासनाने सत्ता सोडावी हे जनमानस आहे. महाआघाडी शासन संवेदनाशून्य आहे. जनहिताच्या सेवा दोन दोन महिने बंद असूनही महाआघाडी शासन शांत आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून शासनाचे घटक स्वार्थी हेतू पूर्ण करण्यात मश्गुल आहेत. आता नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत होत आहे. महाआघाडी शासनाला शासन चालवता येत नसल्याने या शासनकर्त्यांनी सत्ता पदावरून दूर व्हावे, असे जनमानस आहे. महाआघाडी शासनाच्या कार्यकाळात जनतेचे अनन्वित हाल सुरू आहेत. कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न, प्रशासकीय कामकाजातील घोळ, नवनवीन घोटाळ्यात अडकणारे मंत्री, मंत्रालयात न फिरणारे शासन प्रमुख, आरोग्य व्यवस्थेवर पडलेला ताण त्यातून जर्जर झालेली आरोग्य व्यवस्था, ओबीसी समाजाचे गेलेले राजकीय आरक्षण, मराठा आरक्षणाचे भिजत पडलेले घोंगडे, यातून निर्माण झालेले सामाजिक अशांत वातावरण स्वतः घेतलेला कोणताही निर्णय मेहरबान उच्च न्यायालयात प्रभावीपणे टिकवू न शकलेले, सातत्याने पराभूत होणारे महाआघाडी शासन आहे.

ते म्हणाले, या अकार्यक्षम शासनाचा फटका महाराष्ट्रातील जनतेला बसत आहे. जनतेची प्रचंड फरपट सुरू आहे. जनता असहायपणे सर्व सोसत आहे. महाआघाडी शासनाचे प्रमुख घरी बसून आहेत. राजकीय दायित्व नसलेले सत्ताबाह्यकेंद्र शासन चालवत आहे. दीर्घकाळ अध्यक्ष नसलेली विधानसभा, मंत्रालयात न फिरकणारे मुख्यमंत्री, प्रश्नांची जाण नसलेले घोटाळेबहाद्दर मंत्री, या दुष्टचक्रात महाराष्ट्रातील जनता अडकली आहे. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. धाकदपटशा दाखवूनही संप सुरूच आहे. शासनात विलीनीकरण हा मुद्दा निकराचा करून एसटी कर्मचारी धैर्याने लढत आहेत. मात्र, महाराष्ट्र शासनाला याचे सोयरसूतक नाही. एसटी बंद असल्याने राज्यातील व्यवसाय-उद्योग अडचणीत आले आहेत. गोरगरिबाला इच्छितस्थळी पोहोचणे अशक्य झाले आहे. नोकरदार. विद्यार्थी एसटी सेवा नसल्याने खूप अडचणीत आहेत. गावागावात एसटी सेवा नसल्याने नित्य गरजेच्या वस्तू मिळणे अशक्य झाले आहे. शहरात येणारा ग्रामीण वर्ग एसटीअभावी शहरात येऊ शकत नाही. त्यामुळे शहरातील व्यापार थंडावला आहे. अर्थचक्र मंदावले आहे. गरिबी वाढत आहे. आरोग्य सुविधांपासून ग्रामस्थ दुरावले आहेत. अशी अवस्था होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालखंड लोटला आहे.

शासन आपले अस्तित्व दाखवत नाही. एसटी संप मिटण्याची चिन्हे नाहीत. शासनाला जनतेचे हाल दिसण्याइतकी संवेदनाशील दृष्टी राहिलेली नाही. दोन महिन्यांपेक्षा संप चालू असूनही मुख्यमंत्री महोदय याबाबत चकार शब्द उच्चारत नाहीत. आपल्या बगलबच्च्यांचा टूरिस्ट वाहनांचा धंदा तेजीत यावा, त्याला एसटीची स्पर्धा करावी लागू नये यासाठी संप चिघळवण्याचे कुटिल कारस्थान नाही ना, असा प्रश्न पडतो, असेही पटवर्धन म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:37 PM 24-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here