नाणार रिफायनरीचा विषय संपलेला आहे. काही झाले तरी नाणार प्रकल्प होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या कात्रादेवी (ता. राजापूर) येथील सभेत शिवसेनेतर्फे मांडण्यात आली. सभेला खासदार विनायक राऊत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, प्रकल्प विरोधी नेते अशोक वालम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके उपस्थित होते. खासदार राऊत म्हणाले, शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्प पूर्णपणे रद्द केल्याची घोषणा यापूर्वी केली आहेय गुजरातमधील भूमाफिया एकत्र येऊन पुन्हा प्रकल्प उभारण्यासाठी स्थानिकांना हाताशी धरत आहेत आणि ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. मात्र शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. नाणार रिफायनरीचा विषय संपलेला आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प गाडलेला आहे. तो परत कोणी उकरून काढण्याचा प्रयत्न करू नये. प्रकल्प रद्द करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील जनतेला शब्द दिला होता. आता ते मुख्यमंत्री झाले, तरी त्यांच्या तो शब्द कायम आहे. यापुढे या प्रकल्पाला कोणी जे शिवसैनिक पाठिंबा देतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. दरम्यान, सागवे येथील शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांनी रिफायनरीला पाठिंबा दिल्यामुळे पक्षातून काढून टाकण्यात आल्याचे श्री. राऊत यांनी यावेळी जाहीर केले. या भागातील जे शिवसैनिक रिफायनरीला पाठिंबा देतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. शिवसेनेचा गमजा किंवा झेंडा घेऊन कोणी शिवसैनिक रिफायनरीला पाठिंबा देईल त्याची गय केली जाणार नाही. यापुढे जो शिवसैनिक रिफायनरीचे समर्थन करेल, त्याला झोडून काढावे, असेही या सभेत राऊत यांनी सांगितले.
