रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय ग्रंथसखा पुरस्कार देऊन करणार वाचकांचा सन्मान : अॅड. दीपक पटवर्धन

0

रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य, तसेच वाचनालयाचे 195 वर्षातील पदर्पणाचे औचित्य साधत वाचनालयातील 20 वाचकांना ‘ग्रंथसखा’ सन्मान देऊन सन्मानित करणार आहे.

26 जानेवारी 2022 बुधवार रोजी ग्रंथसखा पुरस्कार प्राप्त वाचकांना सन्मानपूर्वक सकाळी 8.30 वाजता वाचनालयामध्ये निमंत्रित करण्यात आले असून वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन व सहकारी व्यवस्थापक मंडळ सदस्यांच्या उपस्थितीत छोटेखानी (कोव्हिडं-19 निर्बंध) कार्यक्रमात ग्रंथसखा पुरस्कार प्रतिमा व सन्मानपत्र प्रदान करणार आहे.

श्री.दिलीप घुडे, श्री. बजरंग भाटकर, डॉ. श्याम जेवळीकर, श्रीम. वैशाली जोशी-कुलकर्णी, डॉ. महेश पोखरणकर, डॉ. सौरभा कांबळे, श्री.मनोज मनवाडकर, श्री.रामनाथ वारंग, श्री. संदीप सावरे, श्री.शांताराम शितप, श्री.शशिकांत भावे, श्री.जगदीश किर, अॅड. मधुरा आठल्ये, श्रीम.राजश्री साने, प्रा. सीमा वीर, श्री. संदीप कडवेकर, श्री. किशोर मयेकर कु. सात्विक मालंडकर, कु.नील मुकादम, व कु. निलाक्षी डिंगणकर या वाचकांना ‘ग्रंथसखा’ पुरस्कार घोषित झाला आहे. या वाचकांनी गेल्या वर्षभरामध्ये वाचनालयातील पुस्तकांचे केलेले वाचन, वाचलेले ग्रंथ यांचा आढावा घेऊन ग्रंथसखा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

या सन्मानाचे मानकरी बुजुर्ग, युवा तसेच बाल विभागातील नियमित वाचक यांचा अंतर्भाव आहे. एक लाख आठ हजार पुस्तकांची भरगच्च ग्रंथसंपदा व या ग्रंथसंपदाचे भरभरून वाचन करणारे वाचक हे वाचनालयाचे वैभव आहे. वाचन संस्कृती ही शहराच्या सुसंस्कृतपणाचा मानबिंदू आहे आणि ही संस्कृती जोपासण्याचे काम करणारी वाचनालये ही सुसंस्कृत शहराचा केंद्रबिंदू आहेत.

वाचक व ग्रंथालये यांचे नाते अतूट आहे. हे अतूट स्नेहबंध अधिक दृढ करताना पुस्तकांचे आवर्जून भरभरून वाचन करणाऱ्या वाचकांना सन्मानित करतानाच अन्य सभासदांना या वाचनालयात येण्यासाठी प्रेरणा मिळावी या दुहेरी हेतूने ‘ग्रंथसखा’ हा पुरस्कार देत आहोत, असे वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:47 PM 25-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here