‘राष्ट्रपतींनी टिपू सुलतानचे कौतुक केले होते, आता भाजप त्यांना राजीनामा मागणार का?’ : संजय राऊत

0

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी टिपू सुलतानवरुन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकात टिपू सुलतानचे कौतुक केले होते, त्यामुळे आता भाजप त्यांचाही राजीनामा मागणार का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

म्हैसूरच्या 18व्या शतकातील शासकाने हिंदूंचा छळ केला आणि त्याचे नाव सार्वजनिक जागेसाठी अस्वीकार्य असल्याचा दावा करत मुंबईतील एका बागेला टिपू सुलतानचे नाव देण्यास भाजपने विरोध केला आहे. यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. त्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकातील एका कार्यक्रमात टिपू सुलतानचे कौतुक केले होते. टिपू सुलतान एक ऐतिहासिक योद्धा, स्वातंत्र्य सेनानी होते, असे राष्ट्रपती म्हणाले होते. त्यामुळे आता भाजप राष्ट्रपतींचा राजीनामा मागणार का? यावर भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे राऊत म्हणाले. तसेच, टिपू सुलतानबद्दल भाजपकडून काही शिकण्याची गरज नाही, अशी टीकाही केली.

नेमकं काय झालं ?

काल महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि मुंबई शहराचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी मालवणी परिसरातील बागेत नवीन सुविधांचे उद्घाटन केले आणि या बागेला टिपू सुलतानचे नाव देण्यात आले आहे, असे सांगितले. यादरम्यान, भाजप युवा मोर्चा, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाव बदलण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली.

भाजपची मागणी काय?

भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात म्हणाले, टिपू सुलतान ऐतिहासिकदृष्ट्या त्याच्या राज्यातील हिंदूंच्या छळासाठी ओळखला जातो. अशा लोकांचा आदर भाजप कधीही स्वीकारणार नाही. बागेला टिपू सुलतानचे नाव देण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, असे ते म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:18 PM 27-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here