गणपतीपुळेत प्रजासत्ताक दिनी साडेचार हजार पर्यटक दाखल

0

रत्नागिरी : शासकीय सुट्टी असली की पर्यटनस्थळांवरील गर्दी वाढते. बुधवारी प्रजासत्ताक दिनी सुट्टी असल्यामुळे परजिल्ह्यातील अनेक पर्यटकांची पावले गणपतीपुळे किनार्‍याकडे वळली होती. दिवसभरात साडेचार हजार पर्यटकांनी मंदिरात हजेरी लावली होती. यामध्ये पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकांचा सर्वाधिक समावेश होता.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे पर्यटनस्थळांवरील गर्दी कमी झाली होती. नव वर्षारंभ आणि ख्रिसमस सुट्टीत कोकणातील पर्यटन स्थळांवर गर्दी झाली होती. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पर्यटकांचा ओघ होता. पण पुढे तो कमी होऊ लागला. ओमीक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पर्यटनस्थळांवरील गर्दीही कमी झालेली होती. परिक्षांची तयारी, शासकीय सुट्ट्या नसल्यामुळे जानेवारी महिन्यात पर्यटनाला बाहेर पडणार्‍यांचे प्रमाण अत्यंत कमी असते.

गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे पर्यटन व्यवसायावर संक्रात आली होती. त्यामधून सावरण्यासाठी व्यावसायिक प्रयत्न करत आहेत. प्रसिध्द पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या गणपतीपुळेत 26 जानेवारीला दिवसभरात परजिल्ह्यातील लोकांचा राबता वाढलेला होता. एकच दिवस सुट्टी असल्याने सांगली, कोल्हापूर येथील पर्यटकांनी हजेरी लावली. सकाळी मंदिरात दर्शन घेऊन किनारी भागात फिरुन ते माघारी परतत होते.

निवासी पर्यटकांचा टक्का कमी असला तरीही असलेली गर्दी व्यावसायिकांसाठी दिलासादायक होती. किनार्‍यावरील जलक्रीडा, उंट व घोड्यांवरील रपेट, जेट स्कीवरुन समुद्र सफरीलाही पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. किनार्‍यावरील फोटोसेशनसाठीही पर्यटक हजेरी लावत होते. किनार्‍यावरील नारळ विक्रेत्यांसह अन्य व्यावसायिकांच्या गाठीही चार पैसे मिळाल्यामुळे सुट्टीचा दिवस लाभदायक ठरला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:23 PM 28-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here