चिपळूण : चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागात असणारे बीएसएनएलचे टॉवर पूर्णपणे बंद अवस्थेत आहेत. बीएसएनएलने महावितरणचे वीज बिल न भरल्याने दसपटी विभाग नॉट रिचेबल झाला. खासगी टॉवरही बंद असल्याने या परिसरात संपर्क साधणे अवघड बनले आहे. दसपटी विभागातील तिवरे धरण फुटून मोठी दुर्घटना घडली. यावेळी देखील ही समस्या जाणवली. या घटनेनंतरही बीएसएनएलने या भागातील टॉवर सुरू केलेले नाहीत. या विभागात दहा ते पंधरा गावांचा समावेश आहे. प्रसिद्ध श्री रामवरदायिनी देवीचे मंदिर आहे. येथील अनेक चाकरमानी मुंबईमध्ये पोलिस खात्यामध्ये, प्रशासकीय पातळीवर काम करीत आहेत. मात्र, असे असतानाही या विभागातील दूरध्वनी आणि मोबाईल सेवा ठप्प झाली आहे. या बाबत अनेकवेळा बीएसएनएलकडे तक्रार करुनही सुधारणा झालेली नाही. तिवरेच्या घटनेवेळी पोलिस, महसूल व एनडीआरएफ जवानांनी वॉकीटॉकीच्या माध्यमातून संपर्क साधला. मोठी घटना घडून देखील त्या भागातील संपर्काचे महत्त्वाचे साधन असणारे दूरध्वनी देखील सुरू झाले नाहीत. या बाबत तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी दसपटी विभागातून होत आहे.
