विक्रम गोखलेंचा अभिनय क्षेत्राला रामराम?

0

कल्याण/मुंबई : त्रास करून घेण्याचे माझे वय नाही मी आता हळू हळू काम कमीच करत आहे. पण आता कुठेतरी थांबायला हवे अशा शब्दात ख्यातनाम अभिनेते विक्रम गोखले यांनी रविवारी आपल्या अभिनय क्षेत्रातील निवृत्तीचे सुतोवाच केले.

आपण तरूण पिढीला मार्गदर्शन करीत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येथील सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्रा. रामभाऊ कापसे व्याख्यानमालेचे रविवारी दुसरे पुष्प गुंफण्यात आले. यावेळी ऑनलाईन प्रणालीद्वारे गोखले यांनी संवाद साधला.

गोखले पुढे म्हणाले की लोककला सादर करताना तुम्हाला त्यात मेहनत घ्यावी लागते. नृत्य, गोष्ट आणि विनोद सांगतानाही मेहनत लागते. तेच योग्य आहे. ते तुम्ही वास्तववादी नाटकांप्रमाणे करून चालणार नाही. परंतू त्या इतक्या मोठया कलेला आपण सध्या विसरूनच गेलो आहोत. या सगळयाचा कधी कधी त्रास होतो. त्रास करून घेण्याचे माझे वय नाही. मी आता काम हळुहळु कमीच करतोय. किती करायचे थांबायला पाहिजे ना कुठेतरी, मात्र मी शिकवितो ज्याला शिकण्याची इच्छा आहे त्यांना मी शिकवतो. जी शिकविण्याची शाळेची कॉलेजची पध्दत आहे त्याप्रमाणे मी शिकवतो. आपल्या गुरूंकडून पुस्तकांकडून मोठ मोठया लोकांकडून जे मिळाले ते सगळ पुढच्या पिढीला देणे महत्वाचे आहे, असेही गोखले म्हणाले.

गोखलेंनी वाढत्या डिजीटलकरणावरही भाष्य केले. डिजीटलच्या लाटेत संवेदना हरवू देऊ नका. सामान्य माणसाची सुख दु:ख सोडून घरातील भांडण, नाचगाणी, बलात्कार, गुंडगिरी, राजकारणी एवढेच आपण सध्या बघू शकतो. समाजाची सुख दु:ख त्यावर भाष्य कोणी करीत नाही. डिजीटलकरणामुळे संवेदना आणि संवेदनशीलता दूर जात आहेत. पैसे कमाविण्याच्या नादात दर्जाहिन मालिका प्रेक्षकांच्या माथी मारल्या जात आहेत. ज्याला काहीच अर्थ नाही यात तुम्हाला काय मिळाले. अंतर्मुख करणारे सिनेमे, नाटक, मालिका बघणे आवश्यक आहे. मनोरंजनाचा हेतू साध्य होतोय का ते आधी ठरवा. ‘घाल पीठ घाल पाणी’ अशी सध्या मालिकांची अवस्था आहे. अशा भिकार मालिका बघणे तुम्हीच बंद करा अशा परखड शब्दात गोखले यांनी प्रेक्षकांना आवाहन केले.

महिलांना स्वातंत्र्य मिळाले नाही

देशाच्या स्वातंत्र्यानंतरही महिलांना पूर्ण स्वातंत्र्य मिळालेले नाही. तिला पुरूष प्रधान संस्कृतीशी भांडूनच आपला अधिकार मिळवावा लागत आहे. स्त्रीला तिचा हकक मिळालाच पाहिजे यासाठी माध्यमांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे गोखले म्हणाले.

मंजुळे यांचे कौतुक

कोरोनाकाळात विदारक चित्रण करणारी शॉर्ट फिल्म काढणा-या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे गोखले यांनी कौतुक केले. त्याच्याबरोबर काम करायला आवडेल असेही ते म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:18 PM 31-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here