रत्नागिरी : लहान मुलांना बेवारस सोडून भिक मागायला लावणाऱ्या आई वडिलांचा जमीन जिल्हा अतिरिक्त न्यायालयाने काल पुन्हा फेटाळला आहे. जून महिन्यामध्ये रत्नागिरीच्या शिवाजी स्टेडीयम वर या तीन भावंडांपैकी एक लहान मुलगी एका नराधमाच्या तावडीत सापडली. पहिल्या पतीपासून झालेली तीन मुले दुसऱ्या नवऱ्याने न स्वीकारल्याने एका महिलेने त्यांना शिवाजी स्टेडियम या क्रीडांगणावर सोडून दिले. ही मुले रात्रभर या स्टेडियममध्येच होती. या मुलीच्या निराधारपणाचा गैरफायदा घेत विकास पवार या मद्यपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि कुटुंबाने वाऱ्यावर सोडलेली ही मुलगी नराधामाची शिकार बनली होती. रत्नागिरी पोलिसांनी या नराधमाला ताब्यात घेत या ठिकाणी आपल्या मुलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या व भिक मागायला लावणाऱ्या या मुलांच्या आईवडिलांनाही गजाआड केले होते. अशा बेफिकीर आईवडिलांना देखील कठोर सजा व्हावी अशी मागणी समाजातून होत होती. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनखाली या प्रकरणाचा तपास करत असणारे पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांनी अत्यंत संवेदनशीलतेने हे प्रकरण हाताळले. या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे अत्यंत तळमळीने या प्रकरणात लक्ष ठेऊन होते. या प्रकरणातील लहान भावंडाना भिक मागायला लावणाऱ्या आई वडिलांचा जामीन काल अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बिले यांनी देखील फेटाळला आहे. याआधी देखील दाखल करण्यात आलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. या लहान मुलांचे आयुष्य उध्वस्त होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या आई वडिलांना देखील कठोर शासन व्हावे अशी मागणी जनतेतून होत आहे.
