आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी

0

सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून आज दुपारी 3 वाजता राणे यांच्या संदर्भात न्यायालय निकाल सुनावणार आहे.

दुसरीकडे आज आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना आज सकाळी कणकवली दिवाणी न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 फेब्रुवारी पर्यंतची न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे आज जिल्हा सत्र न्यायालयात आमदार नितेश राणे न्यायालयाला शरण गेल्यानंतर त्यांच्या नियमित जामिनावर दुपारी 3 वाजता निर्णय येणार आहे.

नितेश राणें ना जामीन मिळणार की, अटक होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे यांचा अटकूपर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळला. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास तसंच नियमित जामिनासाठी अर्ज करावा, असे निर्देश दिले होते. यासाठी कोर्टाने नितेश राणे यांना 10 दिवसांची मुदत दिली होती.

काय घडलं कोर्टात?

नितेश राणे यांच्या जामिनाबाबत झालेल्या कालच्या सुनावणीत सरकारी वकील म्हणून प्रदीप घरत यांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले, ‘सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, नितेश राणे यांनी पहिल्यांदा जिल्हा सत्र न्यायालयाला शरण यावं आणि मग नियमित जामिनासाठी अर्ज करावा, ही अट त्यांच्याकडून पाळली गेली का? तसंच हा हल्ला सुपारी देऊन करण्यात आलेलाच आहे. कारण आरोपींमधील कोणीही संतोष परब यांना ओळखत नाही. त्यामुळे ते हल्ला का करतील? त्यामुळे या प्रकरणाच्या योग्य तपासासाठी काही दिवसांची पोलीस कस्टडी आवश्यक आहे.’

दुसरीकडे संतोष परब यांचे वकील विलास पाटील शिरगावकर यांनीही पोलीस कस्टडीची मागणी केली, ते म्हणाले, ‘कोर्टाला शरण आलेल्या आरोपीला पोलीस कस्टडी व्हायला पाहिजे.’ नितेश राणे यांच्यातर्फे वकील सतीश मानशिंदे यांनी युक्तिवाद केला. दरम्यान या सर्व युक्तीवादानंतर निर्णय कोर्टाने राखून ठेवला असून आज (मंगळवारी) दुपारी 3 वाजता कोर्ट निर्णय सुनावणार आहे.

काय आहे प्रकरण?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:54 AM 01-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here