परीक्षा ऑफलाईन झाली नाही, तर संपूर्ण पिढी बरबाद होईल…; शिक्षणतज्ज्ञांची प्रतिक्रिया

0

मुंबई : आम्हाला दहावी – बारावी बोर्डाच्या परीक्षांचा ७५ टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाईन पद्धतीने मागील वर्षभर शिकविण्यात आला. वर्षभर आम्ही ऑनलाईन पद्धतीने अभ्यास केला, सराव केला. मग आता आमच्या दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने का घेतल्या जात आहेत? यामुळे आमच्या गुणांकनामध्ये निश्चित घसरण होणार असून, हे आमच्या भवितव्याला मारक असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करीत विद्यार्थी सोमवारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर सोमवारी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दहावी – बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने व्हाव्यात, यासाठी आंदोलन केले. राज्यातील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला उपस्थिती लावत, ऑफलाईन परीक्षा रद्द करा, परीक्षा ऑनलाईन घ्या, अशी मागणी लावून धरली. आम्हाला न्याय हवा, अशी घोषणाबाजी यावेळी विद्यार्थ्यांकडून होत होती.

कोरोनाच्या कारणास्तव मागीलवर्षी दहावी – बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करून ऑनलाईन घेण्यात आल्या. त्यासाठी त्या त्या वर्षीच्या मागील वर्षीच्या गुणांचा आधार घेऊन मूल्यांकन पद्धती बदलण्यात आली आणि निकाल लावला. मात्र यंदा आता कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली असून राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांत शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षांसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. येत्या १४ फेब्रुवारीपासून बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत असून त्याच्या मार्गदर्शक सूचनाही मंडळाकडून शाळांना आल्या आहेत.

अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन परीक्षणाची मागणी होणे चुकीचे असून परीक्षा प्रत्यक्ष पद्धतीने झाल्या नाहीत, तर संपूर्ण पिढी बरबाद होण्याची भीती शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, मुख्याध्यापक व्यक्त करीत आहेत. ऑनलाईन अभ्यासासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे पुरेशी संसाधने नसताना, शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही कनेक्टिव्हिटीची समस्या, अडचणी येत असताना, दहावी, बारावी परीक्षांसाठी ऑनलाईन मार्ग कितपत सुकर असेल, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे.

कोणताही स्पष्ट पर्याय न देता फक्त परीक्षा रद्द करा, परीक्षा ऑनलाईन घ्या, विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करा, अशी विधाने लोकप्रियतेसाठी ठीक आहेत; पण वास्तवात त्याची अंमलबजावणी करणे शक्य नाही. हे सर्व बारकाईने तपासून खात्री करूनच शिक्षण विभाग टप्प्या-टप्प्याने निर्णय घेत आहे. योग्य ते समाधानकारक वातावरण निर्माण झालेले असतानाच अशी दिशाभूल होणे आणि त्यात तरुणांना सामावून घेऊन त्यांच्या भावना भडकवणे खूपच धक्कादायक असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:49 PM 01-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here