शालेय अभ्यासाव्यतिरिक्त कलाकौशल्याचे गुण विद्यार्थ्यांच्या अंगी रुजले पाहिजेत, या हेतूने दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात हस्तकला प्रदर्शन आयोजित केले. त्यामध्ये पहिली ते चौथीमधील विद्यार्थ्यांनी एक हजार वस्तू साकारल्या. या वस्तू शाळेतच कार्यानुभव तासाच्या वेळी विद्यार्थ्यांनी बनवल्या, हे विशेष. अभ्यासातील हुशारीबरोबर शाळाबाह्य परीक्षांमध्ये यश मिळवणार्याच अभ्यंकर विद्यामंदिरमध्ये गेली अनेक वर्षे हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. टाकाऊतून टिकाऊ अशी संकल्पना विद्यार्थ्यांना दिली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांनी पुठ्ठा, कागद, आइस्क्रीमचे चमचे, खाऊचे खोके, काडेपेट्यांतील काड्या, काडेपेट्या, रंगीत कागद, खाऊचे रॅपर्सपासून या वस्तू साकारल्या. यात प्लास्टिकचा वापर केलेला नाही. या प्रदर्शनाचे उद्घाटन दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणी सदस्य सौ. विशाखा भिडे यांनी केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहन भावे, मुख्याध्यापक विनोद नारकर, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रदर्शनात एका बाजूला समुद्रातून मासळी काढणार्या बोटी आणि या माशांची वाहतूक करणार्याु गाड्यांच्या प्रतिकृती बनवल्या आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतः शाळेत बनवलेल्या चांगल्या वस्तूंची निवड या प्रदर्शनासाठी केली. कार्यानुभव विषयाअंतर्गत प्रत्येक पहिली ते चौथीच्या बारा वर्गातील विद्यार्थ्यांनी या वस्तू बनवल्या आहेत. कागदी फुले, पेन स्टँड, पुठ्ठ्यापासून केलेले हँगिंग पीस, तोरण, बाहुली, फ्लॉवरपॉट, थ्रीडी फोटो, काडेपेट्यांपासून खुर्च्या, टेबले, आगगाडी, बेडरूम, फिशटँक, काड्यांपासून विविध आकार, शोभिवंत वस्तूंनी प्रदर्शनाची शोभा वाढली. विशेष म्हणजे कोकणच्या शिमगोत्सवातील सजवलेल्या पालख्याही मांडल्या होत्या. प्रदर्शन पाहायला नागरिकांनी गर्दी केली होती.
