रत्नागिरी : मागील दोन महिन्यात पाऊस आणि वाऱ्यामुळे जिल्ह्यातील पाच शाळांचे नुकसान झाले आहे. या शाळांच्या दुरुस्तीसाठी आपत्कालीन निधीची तरतूद नसल्याने यांची तत्काळ दुरुस्ती करणे शक्य नाही. जिल्हा नियोजनकडे निधीची मागणी केली असून, नियमित आराखड्यात त्या शाळांचा समावेश केला आहे. पावसामुळे शाळांचे नुकसान झाल्यामुळे तेथील मुलांची पर्यायी व्यवस्था अन्यत्र करण्यात आली आहे. काही शाळांची छपरे उडाली असून, काहींचे लाकडी सामनही तुटले आहे. त्यात भंडारवाडा (गुहागर), कळमुंडी, पोसरे (चिपळूण), अडखळपाटीलवाडी (दापोली), गोंधळे नं. १ (चिपळूण) यांचा समावेश आहे. या शाळांचे एकूण पावणेसहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शाळांचे नुकसान झाले असले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था करून वर्ग सुरु ठेवण्यात आले आहेत. शासनाच्या निकषानुसार आपत्ती ओढवल्यास त्यादृष्टीने आवश्यक निधी असणे अपेक्षित आहे. शाळा दुरुस्ती किंवा नवीन वर्गखोल्यांसाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करुन दिला जातो. जिल्ह्यातील शाळांची संख्या पाहता मिळणारा निधी अपुरा पडतो. दरवर्षी पावसाळ्यात शाळांची पडझड ठरलेली आहे. त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव करुन तो जिल्हा नियोजनकडून मिळणाच्या निधीसाठी पाठविण्यात येतो. तो निधी मंजूर होईपर्यंत शाळेची दुरुस्ती रखडते.
