अनिल देशमुख व अनिल परब यांच्यात पोलीस बदल्यांंसाठी व्हायच्या गुप्त बैठका, ओएसडी रवी व्हटकर यांची खळबळजनक माहिती

0

मुंबई : पोलीस बदल्यांवरून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांपाठोपाठ परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप होत आहे.

यातच, विशेष कर्तव्य अधिकारी (ओएसडी) रवी व्हटकर यांनी पोलीस बदल्यांंसाठी परब आणि देशमुखांमध्ये गुप्त बैठका होत असल्याची खळबळजनक माहिती सक्तवसुली संचालनालयाला दिली आहे. या बैठकांबाबत कुठेलेही रेकॉर्ड नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

पोलीस आस्थापना मंडळ हे केवळ नावापुरते असून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय हा आधीच घेतला जात असल्याचे व्हटकर यांनी सांगितले आहे. राज्यभरातील काँग्रेस, राष्ट्रवादीतील नेते तसेच शिवसेनेकडून अनिल परब हे पोलीस अधिकाऱ्यांच्या याद्या द्यायचे. पुढे, याच बदल्या आणि नियुक्तीपूर्वी देशमुख आणि परब यांच्यात गुप्त बैठक व्हायची. ज्ञानेश्वरी व सह्याद्री अतिथीगृह किंवा मंत्रालयात या बैठका पार पडल्या आहेत. यादरम्यान माझ्यासह खासगी स्वीय सचिव संजीव पालांडेही बैठकीला हजर असल्याचे व्हटकर यांनी जबाबात नमूद केले आहे. अनेकदा संबंधित पोलीस आयुक्तही हजर राहत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ही बैठक अत्यंत खासगी आणि गुप्त असल्यामुळे या बैठकीचे कोणतेही रेकॉर्ड किंवा इतिवृत्त तयार करण्यात आले नव्हते असेही त्यांनी ईडीला सांगितले. त्यानुसार, निवड झालेल्यांंची यादी पुढे पाठविण्यात येत असल्याचे त्यांनी जबाबात नमूद केले आहे. मुंबई पोलिसांतर्गत बदल्यांची यादीही गृहमंत्रालयात तयार करण्यात आली. ही यादी स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेकवेळा दिल्याचेही व्हटकर यांनी जबाबात म्हटले आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिलेल्या जबाबात, वारंवार सह्याद्री गेस्ट हाऊसला बोलावून अनिल देशमुख आणि मंत्री अनिल परब यांच्याकडून पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात यादी दाखवली जायची. मुंबईतल्या बदल्यांमध्ये अनिल परब आणि अनिल देशमुख यांचा हस्तक्षेप होता असे नमूद करण्यात आले आहे. अनेकदा व्हटकर या याद्या घेऊन येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच, सीताराम कुंटे यांनी अनिल देशमुख गृहमंत्री असताना पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे. अनिल देशमुख यांच्या अधीन काम करत असल्याने मी वरिष्ठांचे आदेश समजून त्यांनी पाठवलेल्या यादीवर स्वाक्षरी करत असल्याचेही कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात नमूद केले आहे.

अनिल देशमुखांच्या जबाबात अनिल परब पोलीस बदल्याची यादी देत असल्याचे नमूद केले होते. कदाचित परब यांना शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी मिळायची आणि ते माझ्याकडे द्यायचे, पुढे तिच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती असे अनिल देशमुख यांनी जबाबात नमूद केले आहे.

व्हटकर यांना एक लाख पगार : व्हटकर हे देशमुख यांचे विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना एक लाख रुपये पगार होता.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:38 PM 05-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here