लतादिदी अनंतात विलीन, शोकाकूल चाहत्यांनी घेतले अंत्यदर्शन; पंतप्रधानांपासून सारेच नतमस्तक

0

मुंबई : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे रविवारी सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अत्यंत शोकाकुल वातावरणात दीदींचे धाकटे बंधू पं.हृदयनाथ मंगेशकर यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला.

सायंकाळी ५.४० वाजता लतादीदींचे पार्थिव शिवाजी पार्क येथे आणण्यात आले. विशेष मंचावर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यापासून काही अंतरावर चंदनाच्या लाकडांची चिताही रचण्यात आली होती. एकापाठोपाठ एक मान्यवर अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्क येथे दाखल झाले. ६ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिवाजी पार्क येथे आगमन झाले. त्यांनी दीदींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले, पुष्पचक्र वाहिले. पाठोपाठ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, गीतकार जावेद अख्तर, मिलिंद नार्वेकर आदींनी दीदींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

सायंकाळी सात वाजता दीदींचे पार्थिव चितेवर ठेवण्यात आले. त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर, त्यांच्याभोवती लपेटलेला तिरंगा आदिनाथ यांच्याकडे सुपुर्द केला. ११ ब्राह्मणांनी अंत्यविधी केल्यानंतर, सव्वासात वाजता मंत्रोच्चारामध्ये पं.हदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना आईसमान असलेल्या लाडक्या दीदीच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. आदिनाथ यांनी पुढील विधी केले. त्याच वेळी ‘लतादीदी अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. लतादीदींच्या चाहत्यांनी साश्रू नयनांनी त्यांना भावपूर्ण निरोप दिला. मान्यवरांनी शिवाजी पार्क सोडल्यावर तेथील पोलीस बंदोबस्तही सैलावला. त्यानंतर, चाहत्यांनी चितेला वंदन करून श्रद्धांजली वाहिली.

दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने रविवार व सोमवार असे दोन दिवस दुखवटा जाहीर केला आहे. या दोन दिवशी सर्व शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आले आहेत. या कालावधीत शासकीय पातळीवर कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. लता मंगेशकर यांना भारतरत्न तसेच पद्मभूषण, पद्मविभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्या राज्यसभेच्या माजी खासदारही होत्या.

पाकिस्तानातही श्रद्धांजली
लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीचा परिणाम फक्त भारतीयांवरच झाला नाही तर पाकिस्तानी लोकांवरही झाला. पाकिस्तानमधील ट्विटरवर ही बातमी टॉप ट्रेंडिंग बनली. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी हे मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या सर्वात प्रमुख व्यक्तींपैकी एक होते. त्यांच्या निधनाचा उल्लेख ‘एका युगाचा अंत’ म्हणून त्यांनी केला. ‘अनेक वर्षे संगीत जगतावर राज्य करणारी एक मधुर राणी’ असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्क येथे शोकाकूल मंगेशकर कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांना धीर दिला. त्यावेळी प्रख्यात गायिका आणि लतादीदींच्या बहीण आशा भोसले, उषा मंगेशकर तसेच राधा मंगेशकर छायाचित्रात दिसत आहेत.

मंगेशकरांची विचारपूस –
– ​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्क येथे आल्यावर दीदींचे भाचे आदिनाथ मंगेशकर यांच्याशी प्रथम संवाद साधला. त्यानंतर त्यांनी दीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तेथून ते थेट मंगेशकर परिवाराच्या दिशेने आले. तिथे त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधला. पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर आणि आशा भोसले यांचीही त्यांनी विचारपूस केली.
ठाकरे कुटुंबाशी संवाद –
– ​मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि​ आदित्य ठाकरे यांच्याशीही पंतप्रधान मोदी यांनी काही क्षण चर्चा केली. उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीविषयीही ते बोलले.
डॉक्टरांशी चर्चा –
– पंतप्रधान मोदी यांनी दीदींंचे दर्शन घेतल्यानंतर सर्वप्रथम दीदींवर उपचार करणारे ब्रीच कॅण्डी रुग्णालयाचे डॉ. प्रतीत समदानी आणि त्यांचे सहकारी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी सोबत आदिनाथही होते.
नायिका ​अपवादानेच –
– ​लता मंगेशकर यांनी ज्यांच्यासाठी आपला स्वर दिला त्या नायिकांपैकी जुन्या-नव्या पिढीतील नायिका अपवादानेच प्रभूकुंज किंवा शिवाजी पार्क येथे दिसल्या.​

​आदित्य ठाकरे यांच्याकडे सूत्रे
– शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय झाल्यावर तेथील तयारीची सगळी सूत्रे ​आदित्य ठाकरे यांनीच हाती घेतली. ब्रीच कॅण्डी रुग्णालय, प्रभूकुंज आणि शिवाजी पार्क अशी सगळीकडे त्यांनी धावपळ केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजशिष्टाचारानुसार स्वागत करण्यासाठी मधल्या काळात ते विमानतळावरही जाऊन आले.
​वडिलांची सेवा
– दीदींच्या पार्थिवाचे अनवाणी पायांनी दर्शन घेऊन शरद पवार पुन्हा खुर्च्यांच्या दिशेने आले. ते तिथे बसताच, खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या शेजारी ठेवलेल्या चपला जवळ आणल्या आणि पवार यांना त्या घालण्यासाठी मदत केली. कॅमेऱ्यांनी हे दृश्य अचूक टिपले.
थेट प्रक्षेपण
– माय बीएमसी, माय मुंबई या यू ट्यूब चॅनलवर मुंबई महापालिकेने लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारांचे थेट प्रक्षेपण केले.​

हृदय पिळवटून गेले –
लतादीदींचे जाणे जगभरातील लाखो लोकांप्रमाणेच माझ्यासाठीही हृदय पिळवटून टाकणारे आहे. लतादीदींच्या विविध गाण्यांतून अनेक पिढ्यांनी एका अर्थाने आपल्या सुप्त, अव्यक्त भावनांचे एका अर्थाने प्रकटीकरण केले. भारतरत्न लताजींच्या कार्याची तुलना होऊ शकत नाही. शतकांमधून एखादा त्यांच्यासारखा कलाकार जन्माला येतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व अद्भुत होते. प्रत्येक भेटीत एक उत्साहपूर्ण आणि स्नेहपूर्ण अनुभवच मिळाला. त्यांचा दैवी स्वर आज शांत झाला असला तरी त्यांची गीते अजरामर आहेत, अनंत काळ त्यांचे गुंजन कायम राहील.
– रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

स्नेहाबाबत भाग्यवान –
लतादीदींच्या जाण्याने देशात कधीही भरून न निघणारी पोकळी तयार झाली आहे. आपल्या सुमधुर आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि भारतीय संस्कृतीच्या खंद्या पुरस्कर्त्या, पाईक म्हणून येणाऱ्या अनेक पिढ्या त्यांची आठवण जागवतील. त्यांच्या गाण्यांनी विविध भावनांचा आविष्कार केला. गेली अनेक दशके भारतीय चित्रपटसृष्टीतील स्थित्यंतरांच्या त्या साक्षीदार राहिल्या आहेत. भारताच्या विकासाबद्दल त्या आग्रही होत्या. आपला भारत देश सशक्त आणि समृद्ध झालेला पाहण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. लतादीदींचा स्नेह मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. त्यांच्यासोबतचा संवाद कायम स्मरणात राहील.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पिढ्यांना प्रेरणादायी –
लता मंगेशकर यांचा मधुर स्वर आज शांत झाला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला. एका युगाचा हा अंत आहे. हृदयाला भिडणारा त्यांचा आवाज, राष्ट्रभक्तीने ओतप्रोत गाणी आणि लतादीदींचे संघर्षमयी जीवन येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. त्यांच्या अंतिम यात्रेस नमन आणि भावपूर्ण श्रद्धांजली.
– सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष

छायाचित्रांनाही दाद –
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या निष्णात छायाचित्रकार होत्या. त्यांच्याशी मध्यंतरी कधीमधी फोटोग्राफी, कॅमेरे याबाबत चर्चा व्हायची. माझ्या दोन्ही छायाचित्र संग्रहांविषयी त्यांनी आवर्जून दाद दिली होती. काही निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, काही कारणांनी चौकशी करण्यासाठी, त्यांचा फोन येत असे. मी रुग्णालयात असताना त्या सातत्याने माझी विचारपूस करीत. त्यांचा स्वर हे परमसौख्य होते. हे सौख्य नियतीने हिरावून घेतले.
– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:12 AM 07-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here