शालेय पोषण आहार योजनेत आता ‘दुध’ वाटप संकल्पनेचा निर्णय

0

आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमधून ‘खाऊ’ गायब होणार आहे. शालेय पोषण आहार योजनेत ‘खाऊ’ ऐवजी सकस आहार म्हणून विद्यार्थ्यांना ‘दुध’ वाटप करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला असल्याची माहिती महानंदचे संचालक प्रा.राजेंद्र सुर्यवंशी यांनी दिली.नुकतंच मुंबई येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, दुग्धविकास मंत्री सुनिल केदार व महानंदचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, उपाध्यक्ष डी.के.पवार आदी पदाधिका-यांच्या उपस्थितीत विधानभवनात झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शालेय पोषण आहार ही शासनाची अत्यंत महत्वकांक्षी योजना आहे.या योजने अंतर्गत शालेय मध्यांतरामध्ये इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भात-वरण,मटकी उसळ,खिचडी,वाटाणा उसळ असा खाऊ मध्यान्न भोजन म्हणून दिले जाते.परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत.या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी येत्या शैक्षणिक वर्षापासून खाऊ ऐवजी दुध वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. दुधामध्ये होणारी भेसळ लक्षात घेता प्लँस्टीक पिशवीतून हे दुध पुरवठा न करता पँक बंद टेट्रापँक कंटेनरव्दारे हा दुधपुरवठा करण्यात येणार आहे.यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल आणि भेसळमुक्त दुध मिळेल.टेट्रापँक कंटेनरमधील हे दूध निर्जंतूक राहणार असून तब्बल ३ महिन्याच्या कालावधी पर्यत हे दुध उपयोगात आणता येणार असल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले. महानंद ही संस्था सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्यामुळे राज्यातील दुध व्यवसायाला उभारी देण्यासाठी या संस्थेला भरीव आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी या बैठकीत दिली असल्याचे प्रा.राजेंद्र सुर्यवंशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here