रत्नागिरीत महिला उद्योजिकांच्या व्हॉट्स ऍप ग्रुपचे ‘श्री शॉपी’ दालन सुरू

0

रत्नागिरी : उद्योजिका महिलांनी एकत्र येऊन दुकान चालू करण्याची ही पहिलीच वेळ रत्नागिरी जिल्ह्यात असावी. त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, असे उद्गार रत्नागिरी ग्राहक पेठच्या निर्माणकर्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती प्राचीताई शिंदे यांनी काढले.

नाचणे (ता. रत्नागिरी) येथे महिला उद्योजिकांच्या व्हॉट्स ऍप ग्रुपचे ‘श्री शॉपी’ दालन सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.

यावेळी त्या म्हणाल्या की, आज तुम्ही सुरू केलेली ही लहान शॉपी भविष्यात लवकरच मोठी जागा घेऊन मोठा मॉल स्थापन करील, यात शंका नाही.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या समर्थ एक्झॉटिका नर्सरीच्या संचालक प्रसिद्ध आहारतज्ज्ञ सौ. कोमल संतोष तावडे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, महिलांनी एकत्र येऊन उद्योग करताना अनेक जण आपले पाय मागे खेचण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न करतात. त्याकडे दुर्लक्ष करून आपला बिझनेस कसा वाढेल, ग्राहकाला खुष कसे करता येईल याकडे लक्ष केंद्रित करावे. ग्राहकांना सेवा देताना आपले वर्तन कसे असावे, याबद्दल अनेक उत्तमोत्तम टिप्स कोमल तावडे यांनी दिल्या. त्या म्हणाल्या, तुम्ही तयार करत असलेल्या मालाचा दर्जा कधी घसरू देऊ नका किंवा त्यात कधी तडजोडही करू नका. ग्राहकाला सर्व सेवा या एका छताखाली मिळतील, असा प्रयत्न तुमच्याकडून झाला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

२०१९ साली स्थापन केलेल्या धनश्री कलेक्शन या खासगी वापरासाठीच्या व्हॉट्स ऍप ग्रुपची व्यापारी ग्रुप म्हणून ओळख निर्माण झाली आणि अल्पावधीत अनेक बेरोजगार महिलांना घरबसल्या रोजगाराचे साधन निर्माण झाले. आजपर्यंत या ग्रुपचे ४ ग्रुप तयार झाले असून त्यातील वीस उद्योजक महिलांनी धाडसाचे एक पाऊल पुढे टाकले आहे आणि अभ्युदयनगर परिसरात श्री शॉपी या गृहउद्योगाच्या दालनाचे उदघाटन केले आहे. यात ग्राहकांना गाऊन्स, साडी, ड्रेस मटेरिअल, लाडू, चिवडा, सांडगे, मिरची, आनंदी पॅड, होममेड साबण, करवंटीपासून वस्तू, फ्रोजन चिकन, फ्रोजन व्हेज, रेडी टू इट पदार्थ, बाळंतविडे, सगळ्या प्रकारची पिठे, नारळ, मातीची भांडी, स्वेटर्स, काचेच्या बांगड्या, सौंदर्य प्रसाधने, सरबते, आगळ, सोलापुरी चादरी, टॉवेल्स, रुूमाल, उदबत्ती, धूप, अत्तर, सेंट मटेरिअल, मेहंदी आदी वस्तू मिळणार आहेत. या नवीन उपक्रमाला रत्नागिरीकरांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन महिला उद्योजकांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:26 PM 07-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here