होय, तुम्ही जनतेला वाऱ्यावर सोडले म्हणून आम्ही ट्रेन सोडल्या; पंतप्रधान मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर

0

मुंबई : केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे महाराष्ट्रात जे लोक अडकून पडले होते, त्यांना घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी ट्रेन सोडल्या. महाविकास आघाडी सरकारने परप्रांतीयांना परत जाण्याची सोय करून दिली.
त्यावेळी उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांनी आपल्या सीमा बंद करून ठेवल्या होत्या. महाराष्ट्रातून ज्या बसेस उत्तर प्रदेश बॉर्डरपर्यंत गेल्या तिथल्या लोकांचे बेहाल झाले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेशची जनता भाजपला जाब विचारत आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर आरोप करण्यासारखा बेजबाबदारपणा दुसरा नाही, अशा शब्दात काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले.

मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आकडेवारीच दिली. ते म्हणाले, लोक स्वतःहून नियम मोडून स्टेशनवर गर्दी करत होते. रेल्वे बंद असल्यामुळे रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना थाळ्या वाजवणे आणि दिवे लावण्याचे काम सांगत होते.

‘१२,१०,२५५ परप्रांतीय पाठवले आपापल्या घरी’
१ मे ते ३१ जुलै २०२० या कालावधीत ८४२ रेल्वे सोडण्यात आल्या. त्यातून १२ लाख १० हजार २५५ परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात मूळ गावी सोडण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ९७ कोटी ७३ लाख ९४ हजार ८५० रुपये देण्यात आले.

‘कोरोनाकाळात मोदींनी देशाला सोडले वाऱ्यावर’
कोरोना पसरण्यास काँग्रेस दोषी असल्याचे खापर पंतप्रधान मोदी यांनी फोडल्यावर त्याला काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले. कोरोनाकाळात मोदींनीच देशाला वाऱ्यावर सोडले, अशी टीका त्यांनी केली. निवडणुकांत अन्य मुद्दे मागे पडावेत, अपयश झाकले जावे, यासाठी हे आरोप सुरू आहेत. वेळीच साथीला आळा घालण्यात राज्ये नव्हे, तर केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य त्या पदावरील व्यक्तीला शोभणारे नाही. कोरोना काळात उत्तर भारतीय मजूर बांधवांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणि काँग्रेसने केलेल्या मदतीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

मोदी यांचे आरोप दुर्दैवी, अशोभनीय आणि निखालस खोटे आहेत. ही जागतिक महामारी भारतात आलीच कशी? त्यासाठी जबाबदार कोण? याची उत्तरे त्यांनी दिली पाहिजे. आपले अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकार काँग्रेसवर चुकीचे आरोप करत आहे, असा हल्ला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला.

केंद्राला आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करता आली नाही. त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांची सभा घ्यायची होती. कुंभमेळा भरवायचा होता. वेळीच विमानसेवा बंद केली असती तर कोरोना देशात आलाच नसता. यूपीत नदीत वाहून गेलेल्या मृतांचे नातेवाईक आता भाजपला जाब विचारत आहेत. ज्या महाराष्ट्राने उत्तर प्रदेश, बिहारच्या लोकांना नोकऱ्या दिल्या, त्यालाच बदनाम करून मते मिळवण्याची भाजपची ड्रामेबाजी आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:37 PM 08-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here