पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र व देशाची माफी मागावी : डॉ. नितीन राऊत

0

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत केलेले वक्तव्य संपूर्ण देशवासियांचा विशेषतः महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड व पंजाब या राज्यांमधील जनतेचा, तेथील श्रमिकांचा अपमान करणारा आहे. त्यांचे वक्तव्य हे महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही असून त्यांनी या वक्तव्याच्या माध्यमातून असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे.

मोदींचे हे व्यक्तव्य म्हणजे एका पराभूत सम्राटाची हताशा आहे. त्यांच्या या वक्तव्याबद्दल देशातील नागरिक त्यांना कधीही क्षमा करणार नाही. कोरोनाच्या आघाडीवर आलेल्या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारण्याचा प्रामाणिकपणा मोदीने दाखवून जनतेची माफी मागावी, अशी मागणी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मुंबई येथील आपल्या पर्णकुटी येथील निवास्थानी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चे दरम्यान केला आहे.

“खरेतर हजारो मैल पायी चालत गेलेल्या व या प्रवासात आपले कुटुंबिय गमावलेल्या मजुरांची मोदींनी माफी मागायला हवी होती. उलट त्यांनाच सुपर स्प्रेडर ठरवून मोदींनी देश निर्माणात अमूल्य योगदान देणा-या मजुरांचा अपमान करून त्यांच्या जखमांवर मीठ चोळले आहे”, असे ते यावेळी म्हणाले.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड व पंजाबात गेलेल्या सर्व मजुरांना त्यांनी मोदींनी व त्यांच्या पाठिशी उभे राहणा-या पक्षाला माफ करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. या तीनही राज्यात भाजपविरोधी मतदान होणार असल्याने आपल्या अपयशाचे खापर काँग्रेसवर फोडण्याचे क्षुद्र राजकारण मोदी करत आहेत, असे ते म्हणाले.

कोरोनाचे संकट चीनमध्ये उद्भवल्यानंतर विदेशातून येणा-या विमान प्रवाशांना सक्तीचे क्वारंटाईन केले असते तर हा आजार देशभर पसरला नसता. मात्र अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या निवडणुकीसाठी भारतीयांची मते मिळावित यासाठी त्यांचा नमस्ते ट्रम्प कार्यक्रम २४ आणि २५ फेब्रुवारी २०२० रोजी भारतात करता यावा म्हणून विदेशातील विमान प्रवासांवर निर्बंध मोदी सरकारने लादले नाहीत, असा आरोपही डॉ राऊत यांनी केला आहे.

दिल्लीत तब्लिगी जमातच्या मार्च २०२० मधील कार्यक्रमास मोदी सरकारने परवानगी दिली. मात्र, महाराष्ट्र सरकारने कोरोना वाढू शकतो या कारणाने या जमातला परवानगी नाकारली होती. मात्र, जमातचा कार्यक्रम आटोपल्यावर देशात २५ मार्चपासून टाळेबंदी लादली आणि मुस्लीमाना कोरोना पसरवण्यासाठी दोषी ठरवून याला हिंदू मुस्लिम रंग देण्यात आला. त्यावेळी मुस्लिमांना कोरोना स्प्रेडर ठरवले गेले आत्ता मजुरांना कोरोना स्प्रेडर ठरवले जात आहे, अशी टीका ही डॉ राऊत यांनी केला.

जानेवारी ते मार्च २०२० या अडीच महिन्यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर विदेशातून आलेल्या प्रवाशांमुळे देशात कोरोना पसरला. याला मोदी व त्यांचे असंवेदनशील राजकारण जबाबदार आहे, असा घणाघाती आरोप डॉ. राऊत यांनी केला.
कोरोना हे गंभीर संकट असून त्याकडे वेळीच लक्ष द्या, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०२०च्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सांगितले. मात्र, त्यावेळेस त्यांची मोदी व भाजपने खिल्ली उडवली. शेवटी कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती व महामारी आहे हे मोदी सरकारने १४ मार्च २०२० रोजी मान्य केले. त्यानंतर अवघ्या दहा दिवसात ४ तासांची पूर्वसूचना देऊन देशात टाळेबंदी केली. या टाळेबंदीने देशातील सर्वसामान्य माणूस विशेषतः श्रमिकांवर आकाशच कोसळले. त्यांचे उत्पन्नच बंद झाले. कोरोनात आपण जिवंत राहू की नाही, आपल्या गावात राहणा-या कुटुंबियांचे काय होईल या चिंतेने हे मजूर आपापल्या राज्यात, गावात पायी परतू लागले. हे पाहून डॉ. राऊत यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनियाजी गांधी यांना पत्र लिहून मजुरांना मदत करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यायला हवा, अशी विनंती केल्याचे सांगितले.

डॉ. राऊत यांनी त्यानंतर नागपुरात राहणा-या उत्तर प्रदेश बिहारसारख्या राज्यातील मजुरांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी रेल्वेगाड्यांनी पाठवण्यासाठी ५ लाख देऊन व्यवस्था केली.

त्यांच्या पुढाकाराची दखल घेत सोनिया गांधी यांनी राज्यातील काँग्रेसला एक पत्र पाठवून मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर प्रदेश काँग्रेसच्या पातळीवर मजुरांना मदत करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. मजुरांना मदत करणे हा गुन्हा असेल तर हा गुन्हा काँग्रेसचे कार्यकर्ते हजारो वेळा करतील, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

भाजप महाराष्ट्रद्रोही नुकतेच महाराष्ट्रात येऊन गेल्यानंतर दुस-याच दिवशी मोदींनी महाराष्ट्रद्रोही वक्तव्य केले. भाजप व मोदी हे महाराष्ट्रद्रोही आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. सुरूवातीला भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याऐवजी आपले वेतन पीएमकेअर निधीत जमा केले आणि आता मोदीच महाराष्ट्रविरोधी भूमिका घेत आहेत. यावरून भाजप महाराष्ट्राचा किती पराकोटीचा व्देष करते हे सिद्ध झाले आहे, असा आरोपत्यांनी केला.

काँगेसने मुंबई व नागपुरात हजारो लोकांची मदत केली तेव्हा भाजपचे लोक कुठे होते ?
काँग्रेसने मजुरांना तिकिटे काढून देऊन त्यांच्या गावी पाठवले. त्यामुळे लोकलज्जेस्तव नंतर मोदी सरकारने श्रमिक ट्रेन सुरू केल्या. मजुरांना या ट्रेन मोफत घेऊन जातील, असा खोटा दावा केला. मात्र प्रत्यक्ष त्यांच्याकडून महागडे दर आकारण्यात आले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मजुरांच्या प्रवासाचा खर्च सुरूवातीला काँग्रेसने व नंतर महाविकास आघाडी सरकारने केला व लोकांना मदत केली. मात्र जेव्हा हे मजूर आपापल्या गावी परतले तेव्हा मात्र याच भाजपने आमच्यामुळे हे मजूर गावी परतले असे दावे करून स्वतःची पाठही थोपटून घेतली. श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून मे ते जुलै २०२० या काळात ७० लाख मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवल्याबद्दल मोदी सरकारने स्वतःची पाठ थोपटवुन घेतल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र भाजपने ३ जून २०२० रोजी केलेल्या ट्विटव्दारे ५८ लाख लोकांना आपल्या राज्यात पोहोचवल्याचे श्रेय घेऊन केंद्र सरकारची पाठ का थोपटण्यात आली ? असा सवाल त्यांनी केला.

मोदी महाराष्ट्रद्रोही भूमिका घेत असताना किमान राज्यातील भाजप नेत्यांनी सद्सद्विवेकबुद्धी दाखवून या पापात सामील होऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र काँग्रेसने रवानगी केलेल्या मजुरांमुळे जर कोरोना पसरत होता तर इतर ठिकाणाहून गेलेल्या या लाखो मजुरांमुळे तो पसरत नव्हता असा विचित्र तर्क केवळ भाजपच लावू शकते, या ढोंगीपणाची त्यांना कीव येत असल्याचे म्हटले.

मोदी सरकारने विदेशात अडकलेल्या भारतीयांना देशात आणण्यासाठी वंदे भारत ही हवाई मोहीम व नौदलामार्फतही मोहीम राबवली. या मोहिमांच्या माध्यमातून ८ लाखांवर लोक देशात परतले. मजुरांना मरणासाठी वा-यावर सोडणा-या मोदी सरकारने विदेशातील भारतीयांना मात्र व्हीआयपी सेवा देत भारतात आणले. जर मजुरांमुळे कोरोनाचा प्रसार होतो तर विदेशातून आलेल्या या ८ लाख लोकांमुळे तो पसरला नाही, असे त्यांना वाटते का, असा प्रश्न त्यांनी भाजपला करीत मोदी व भाजप हे कामगारांचा, गरिबांचा भयंकर व्देष करतात, असा आरोप त्यांनी केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:49 AM 09-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here