ब्रिटन सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) संभाव्य परिणामांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. आम्ही भारतातील घटनांवर बारकाईने नजर ठेवून आहोत, असेही ब्रिटनने म्हटले आहे. मंगळवारी प्रतिनिधी सभागृहात भारतातील हिंसाचारावर विरोधी मजूर पक्षाचे खासदार खालीद महमूद यांनी मांडलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ब्रिटनचे विदेश आणि राष्ट्रकुल कार्यालयाचे राज्यमंत्री नायजेल अॅडम्स यांनी सांगितले की, ब्रिटन मानवी हक्कासह सर्व स्तरांवर भारताशी चर्चा करीत आहे. भारताचा सर्वसमावेशी संस्कार आणि धार्मिक सहिष्णुतेचा गौरवशाली इतिहासाचाही त्यांनी हवाला दिला.
ब्रिटन सरकार सीएएच्या संभाव्य परिणामांबाबत चिंतित आहे. भारत सरकारशी आमचे जवळचे संबंध असल्याने आम्ही कठीण मुद्यांवर भारताशी चर्चा करू शकतो. अल्पसंख्याक समुदायासह अन्य मुद्यांवर आम्ही आमची चिंता मांडीत असतो. भारतातील घटनांवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून काही चिंता असेल, तर त्यांच्याकडे व्यक्त केली जाईल.
