विकासकामे करताना शहरातील खालच्या भागाबाबत दुजाभाव; विरोधकांचा आरोप

0

रत्नागिरी : विकासाबाबत शहराचे दोन भाग पाडल्याची मोठी खंत शहरातील खालच्या भागातील नागरिकांमध्ये आहे. वरच्या प्रभागामध्ये ज्या गतीने विकासकामे होत आहेत त्या तुलनेत जयस्तंभपासून खालचा भाग उपेक्षित राहिल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. याचा मोठा परिणाम शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांना आगामी पालिका निवडणुकीत भोगावा लागणार असल्याची उघडउघड चर्चा काही नागरिक करीत आहेत. भाजप, राष्ट्रवादी आदींनी त्याची पेरणीही करण्यास सुरवात केली आहे.

रत्नागिरी पालिकेवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे. मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे विकासकामांचा शहरात धडाका सुरू आहे; मात्र हे सर्व करत असताना सत्तेत असलेल्या काहींनी फक्त आपला प्रभाग सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. बाकी शहरात काय झाले काय नाही, याचा विचार न करता आपला प्रभाग बांधून आगामी पालिका निवडणुकीतील बेगमी करून ठेवली. या सर्व प्रक्रियेमध्ये जयस्तंभपासून खालच्या भागाची प्रत्येकवेळी उपेक्षाच झाली आहे. कोणते उद्यान असो, रस्ते, गटारं असो, पर्यटन विकासाच्या दृष्टीने केलेले काही प्रकल्प असो, सर्व वरच्या भागातच होतात; मात्र शहराच्या खालचा भाग या विकासापासून दूर राहतो.

याबाबत सेनेला खालच्या भागातील काही नगरसेवकांनी घरचा आहेर दिला होता. त्यावरून पार्टी मीटिंगवर काही नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता. विकासकामात डावलल्याबाबत जाहीर नाराजीही व्यक्त केली होती; मात्र सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी केली होती. हा ठपका पुसण्यासाठी शहराच्या खालच्या भागात उद्याने, तलाव विकसित केले जाणार असल्याचे स्पष्टीकरणदेखील देण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात अजून त्याची कोणतीही सुरवात नाही. दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती वरच्या भागातून, नवीन रस्त्यांची सुरवात वरच्या भागातून हे प्रभाग चकचकीत झाले असले तरी खालच्या भागातील काही रस्ते अजुन रखडले आहेत. विशेष म्हणजे मांडवी बंदराकडे जाण्याचा मुख्य रस्ता अजूनही तसाच आहे. पर्यटक या रस्त्यावरून पर्यटनासाठी जाताना त्याचा उत्साह मावळतो. स्थानिक नगरसेवक रस्ता व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत; परंतु त्यांचे कोणीही मनावर घेताना दिसत नाही. विकासाबाबत शहराचे दोन भाग पाडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

पायउतार झालेल्या शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांनी खालच्या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यांची या भागासाठी नियोजन करण्याची मानसिकता नाही. ही जुनी रत्नागिरी आहे; मात्र विकास होताना वरच्या भागात सर्व काही होत आहे. आरोग्याचा प्रश्न आहे. कितीही पाठपुरावा केला तरी त्याचा उपयोग होत नाही. विकासकामांमध्ये शहराचे दोन भाग पाडून खालच्या भागावर अन्याय केल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे.– सचिन करमरकर, रत्नागिरी शहराध्यक्ष भाजपा

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:48 PM 14-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here