पोलादपूर नजीक दरड कोसळल्याने महामार्ग ठप्प

0

महाड(रायगड) : मागील ४८ तासांपासून महाड तसेच पोलादपूर तालुक्यात होत असलेल्या तुफानी पर्जन्यवृष्टीने सावित्री, काळ, गांधारी नदी दुथडी भरून वाहत आहे. महाड शहरात पुराचे पाणी गेल्या आठ दिवसात तिसऱ्यांदा शिरले आहे. रात्री उशिरापासूनच स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे इशारे देणारे भोंगे वाजवून जागरूक राहण्यास सांगितले. 

दरम्यान, मुंबई – गोवा महामार्गावरील पोलादपूर शहरानजीक गोव्याच्या दिशेने काही किलोमीटर अंतरावर दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. काल मध्यरात्री धामणदेवी परिसरात २००५ साली दरड कोसळलेल्या भागात दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळाकरता बंद करण्यात आली होती. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नाने वाहतूक पूर्ववत झाली. मात्र आज (ता.३) पहाटे सोलापूर शहरानजीक दरड कोसळण्याच्या घटनेने पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग वाहतूक बंद करण्यात आली. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे इशारा दिला असून शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती  प्राप्त झाली आहे. पहाटे  पाचच्या सुमारास झालेल्या घटनेनंतर पोलादपूर पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली असून आपत्ती निवारण कक्षातून यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून या मार्गावर रुग्णवाहिकाही पाठविण्यात आल्याची माहिती पोलादपूर पोलीस ठाण्यातून प्राप्त झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here