गरज पडल्यास ओबीसी आरक्षणासाठी देखील रस्त्यावर उतरणार : खासदार संभाजीराजे

0

मुंबई : आज मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करतोय, गरज पडल्यास ओबीसी आरक्षणासाठी देखील रस्त्यावर उतरणार असल्याचं खासदार संभाजीराजें छत्रपती यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईत सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाच्या प्रश्नी आपण 26 फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाला बसणार असल्याचं जाहीर केलं आहे.

याबाबत अधिक बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, ”मी सर्वांना सोबत घेऊन जाणारा माणूस आहे. मी शाहू महाराजांचा वारस आहे. मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की आम्हाला टिकणारे आरक्षण द्या. मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना हात जोडून विनंती केली की आरक्षण द्या. आरक्षण कशामुळे गेलं हे देखील सांगितले. परंतु त्यावर काहीच हालचाल झाली नाही. मी आरक्षण रद्द झाल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन दखल करा असं सांगितल. खूप दिवसांनंतर त्यावर याचिका दाखल करण्यात आली. सध्या त्याची काय स्थिती आहे हे काहीच माहिती नाही. माझं स्पष्ट मत आहे की समिती स्थापन करा.”

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, ”मराठा समाज देखील वंचित घटक आहे. 2007 पासून मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली. मी मराठा आहे म्हणून मराठा आरक्षणासाठी लढतो आहे असं नाही. 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झालं. त्यावेळी मला समन्वयकांनी सांगितलं की टोकाची भूमिका घेऊ नका. मोजून पाच ते सहा मागण्या आहेत. परंतु अजूनही मान्य होत नाहीत. मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मी अनेक दिग्गजांच्या भेटी घेतल्या आहेत. राज्यभरातील अनेकांसोबत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी चर्चा केली आहे परंतु सरकार काहीच हालचाल करत नाही. त्यामुळे आता 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार आहे,”

संभाजीराजेंनी केलेल्या मागण्या नेमक्या काय आहेत?
1) मराठा आरक्षणामुळे 2014 ते पाच मे 2021 पर्यंतच्या शासन सेवेत निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्ती द्याव्यात.
2) ‘ओबीसी’च्या धर्तीवर मराठा समाजाला सवलती लागू करा.
3) ‘सारथी’ संस्थेची कार्यालयं प्रत्येक महसुली विभागात सुरू करावीत. त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ‘सारथी’ संस्थेची उपकेंद्रे सुरू करून त्याठिकाणी शिक्षण, संशोधन व प्रशिक्षणाचे उपक्रम राबवावेत. संस्थेला एक हजार कोटींची तरतूद करुन तारादूत प्रकल्प तत्काळ सुरू करावा.
4) अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरघोस निधी मिळावा. लाभार्थी पात्रतेसाठी असलेल्या अटी शिथिल करत व्याज परताव्याची 10 लाख रूपयांची मर्यादा वाढवून ती किमान 25 लाख रूपये करावी.
5) शासनाकडून पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता दिला जातो. मुंबई, नागपूर, पुणे अशा महानगरांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 3000 रूपये व इतर ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 2000 रूपये प्रति महिना दिले जातात. ही रक्कम वाढवावी.
शासनाकडून मागासवर्गीय वसतिगृहांच्या धर्तीवर मराठा विद्यार्थ्यांसाठी देखील पहिल्या टप्प्यात किमान प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरूपी वसतिगृहांची उभारणी करावी. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये सुपर न्यूमररी सीट्स निर्माण कराव्यात.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:39 AM 15-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here