संजय राऊत यांच्या आजच्या पत्रकार परिषदेबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, म्हणाल्या…

0

मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांकडून देशभरात ठराविक राजकीय पक्षांच्या नेत्यांविरोधात होत असलेली कारवाई, भाजपच्या नेत्यांकडून होत असलेले आरोप या सगळ्याला उत्तर देण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आज मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या विरोधात मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात मोठं विधान केलं आहे. त्यामुळं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व सुप्रिया सुळे आज पुण्यात एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेचा उल्लेख केला. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी यावर भाष्य केलं. ‘तीन वाजेपर्यंत आम्हाला जी काही प्रसिद्धी द्यायची आहे ती द्या, त्यानंतर सिक्सर आहे,’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यामुळं सुप्रिया सुळे यांना काही तरी माहिती असावी असं वाटून पत्रकारांनी त्यांना अधिक विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर मात्र त्यांनी सविस्तर बोलणं टाळलं. ‘संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेचा विषय नेमका काय आहे मला माहीत नाही. पण राज्य नव्हे, देशही या पत्रकार परिषदेकडं अपेक्षेनं बघतोय. ते काय बोलतायत त्यांची आपण सगळे वाट बघूयात. राऊत यांनी इशारा दिला आहे म्हणजे काहीतरी राज्याच्या हिताचंच असेल, आणखी दोन तीन तासांत कळेलच, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

भाजपचे माजी खासदार रोजच्या रोज राज्य सरकारमधील नेते व मंत्र्यांवर करत असलेल्या आरोपांवरही त्यांनी भाष्य केलं. ‘महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधीच झालं नाही. रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेऊन आरोप करणं हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या परंपरेला हे साजेसं नाही. घोटाळे झाले आहेत असा कुणाचा आरोप असेल तर त्यांनी कोर्टात जायला हवं. पण उठसूट आरोप करणं हे टीव्ही सीरियलच्या जाहिरातीसारखं झालंय,’ असा सणसणीत टोला सुप्रिया सुळे यांनी हाणला.

‘केंद्र सरकार सातत्याने आइसचा (Income Tax, CBI, ED) गैरवापर करत आहे. विरोधी पक्षाच्या लोकांनाच कारवाईच्या नोटिसा कशा येतात? भाजपमध्ये गेल्यावर नोटिसा कशा विरघळतात, कोणत्या श्रेडरमध्ये जातात, असा प्रश्न त्यांनी केला. हा भीती दाखवण्याचा आणि दडपशाहीचा प्रयत्न आहे,’ असा संतापही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:23 PM 15-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here