सीबीआय आता संजीव पालांडे आणि सचिन वाझे यांचा जबाब पुन्हा नोंदवणार; न्यायालयाची मान्यता

0

मुंबई : अनिल देशमुखांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींची पुन्हा चौकशी करण्यासाठी सीबीआयनं दाखल केलेला अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं स्वीकारला आहे.

याप्रकरणी अटकेत असलेले देशमुखांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि सचिव कुंदन शिंदे यांच्यासह बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची पुन्हा चौकशी करण्यासाठी केंद्रीय तपासयंत्रणेनं एनआयए कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्याची दखल घेत कोर्टान सीबीआयला तिघांचीही दोन दिवस चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी पीएमएलए न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान सीबीआयच्यावतीनं दाखल या अर्जावर सुनावणी झाली.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांची ईडी मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरू केली. 21 एप्रिल रोजी, देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवून 12 तासांच्या चौकशीनंतक 1 नोव्हेंबर रोजी ईडीनं देशमुखांना अटक केली. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. 29 डिसेंबर 2021 रोजी ईडीनं देशमुखांविरोधात पुरवणी आरोपपत्र आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए) अंतर्गत विशेष न्यायालयात दाखल केले. सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र असून या प्रकरणातील हे दुसरे आरोपपत्र आहे. आरोपपत्रानंतर देशमुखांनी पीएमएलए न्यायालयात नियमित जामीन अर्ज केला आहे.
माजी गृहमंत्र्यांचे वय आता 73 आहे. त्यांना अनेक शारिरीक व्याधींनी ग्रासलं असून ते तीन महिन्यांहून अधिक काळ कारागृहात असल्याचा दावा देशमुखांच्यावतीने बाजू मांडताना ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी कोर्टात केला. तसेच हे प्रकरण परमबीर आणि वाझेच्या वक्तव्यांवर आधारित असून जेव्हा या प्रकरणावर सुनावणी पाडायच्या आधीच देशमुखांच्या कुटुंबियांच्या घरांवर, कंपन्यांवर ठापे टाकले जातात. आतापर्यंत 14 वेगवेगळ्या दिवशी केंद्रीय तपास यंत्रणेकडून 70 वेळा छापेमारी केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र आता देशमुख आजारी आहेत त्यामुळे वैद्यकीय कारणासाठी जामीन मागत नसून या प्रकरणात शिक्षा झाल्यास जास्तीतजास्त 7 वर्षांची आहे. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंतीही त्यांनी याचिकेतून केली आहे.

देशमुखांचे स्विय सहाय्यक पालांडे आणि सचिव कुंदन शिंदे यांची यासंदर्भात आणखी चौकशी करण्यासाठी सीबीआयकडून न्यायालयात अर्ज करण्यात आला. या दोघांचेही जबाब नोंदवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी न्यायालयाकडे केली. त्याची दखल घेत पालांडे आणि शिंदे यांची अनुक्रमे 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी आर्थर रोड कारागृहात जाऊन चौकशी करण्याची परवानगी न्यायालयाने सीबीआयला दिली. तर दुसरीकडे, बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेचीही चौकशी करण्याची मागणी तपास यंत्रणेकडून करण्यात आली होती. त्याचीही अनुमती देत न्यायालयाने सीबीआयला 15 आणि 16 या दोन दिवशी तळोजा कारागृहात जाऊन सचिन वाझेची जबानी नोंदवण्यास परवानागी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:34 PM 16-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here