केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्किल इंडिया योजनेसाठी राज्यातील कोल्हापूर व रत्नागिरी जिल्हय़ाची निवड करण्यात आली आहे. या योजनेमधून 321 लाखांचा निधी जिल्हय़ासाठी मिळणार असून 27 व्यावसायिक प्रशिक्षकांमार्फत हजारों तरूणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हय़ाचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हय़ांचा कौशल्य विकास आराखडा सादर करण्याच्या सुचना केंद्र सरकारकडून गतवर्षी देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अलीकडेच दिल्लीमध्ये कौशल्य विकास मंत्रालयासमोर या प्रस्तावांचे सादरीकरण झाले. देशातील 225 जिह्यांनी प्रकल्प सादर केले होते. त्यातील 25 जिह्याची निवड करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील दोन जिह्यांना स्थान मिळाले असून त्यात रत्नागिरी, कोल्हापूरची निवड करण्यात आली आहे. या योजनेमुळे जिल्हय़ाच्या सर्वागीण विकासाला गती मिळणार असून प्रभावी अंमलबजावणीसाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. या महिन्यातच प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
