रत्नागिरी: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना सकाळी १० ते ११ आणि दुपारी ३.३० वाजता दिवसातून दोन वेळा चहावाला फेरी सुरु करण्यात यावी, असे पत्र सामान्य प्रशासनाकडून काढण्यात आले. त्यावरुन कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. मात्र, परिषदेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्याच जागेवर चहाची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने उपहारगृह चालकांना पत्र काढण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी चहासाठी बाहेर जाऊ नये, असे बंधन घालण्यात आलेले नाही, अशी माहिती सामान्य प्रशासन अधिकारी अर्चना वाघमळे यांनी दिली. त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी निःश्वास सोडला आहे.
