राज्याच्या घराघरात, मनामनात शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा होऊ दे : उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई : उपमुख्यमंत्र्यांनी स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांनाही वंदन केले असून, शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊ दे, अशा शब्दात राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘”महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत, ताकद त्यांनी महाराष्ट्राला दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात जन्मलेल्या राज्यातल्या प्रत्येक पिढीनं प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन जपला. महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही, यापुढेही झुकणार नाही हा महाराष्ट्राभिमान महाराष्ट्रवासियांमध्ये जागवण्याचं श्रेय सर्वार्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, शौर्य, धैर्य, पराक्रम आणि विचारांना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य असून त्यांना आदर्शस्थानी ठेवूनंच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल राहीली आहे, यापुढेही तशीच राहील,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शिवजयंतीनिमित्त त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केलं आहे.

शिवजयंतीनिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते आहेत. महाराजांनी संघर्षातून स्वराज्य निर्माण केलं आणि ते रयतेला अर्पण केलं. महाराज भोगवादी राजे नव्हते, ते रयतेचे राजे होते. शेतकऱ्यांचे कैवारी होते. कलावंतांचे आश्रयदाते होते. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली. त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य रयतेच्या कल्याणासाठी होतं. महाराज दूरदृष्टीचे नेते होते, बिकट प्रसंगात त्यांनी प्रसंगी तात्पूरती माघार घेतली, परंतु रयतेला धोका होईल, असा निर्णय घेतला नाही. महाराजांच्या या इतिहासातून आजच्या राज्यकर्त्यांनी धडा शिकला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या जीवनातला कुठलाही प्रसंग, त्यांच्या कुठल्याही निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर, त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय स्वराज्याचं हित, जनतेचं कल्य़ाण, डोळ्यासमोर ठेवून, दूरदृष्टीनं घेतला होता, हे आपल्या लक्षात येईल. राज्यातलं महाविकास आघाडी सरकार देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना, धोरणांना, कारभाराला आदर्श मानून काम करत आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना अभिवादन केलं आहे. शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊ दे, अशा शुभेच्छाही त्यांनी राज्यातील जनतेला दिल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:27 AM 19-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here