एसटी सेवा बंद असल्याने दुचाकीने कॉलेजला निघालेल्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू

0

खारेपाटण : मुंबई-गोवा महार्गावर नडगिवे घाटीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नडगिवेच्या समोर दुचाकी अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. स्वामी विराट राणे (वय १८, रा. तळेरे गावठण) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

आज, सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. एस.टी सेवा बंद असल्याने तो दुचाकीवरुन कॉलेजला निघाला असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण तसेच तळेरे विभागात हळहळ व्यक्त होत होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्वामी राणे हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. खारेपाटण ज्युनिअर कॉलेज १२ वी सायन्स वर्गात तो शिकत होता. १२ वी सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या सध्या बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असून या परीक्षेकरिता तो कॉलेजमध्ये निघाला होता. मात्र, एस टी गाड्या बंद असल्याने मोटारसायकलने तो कॉलेजला जात होता.

दरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगीवे घाटीत दुचाकीवरील ताबा सूटल्याने दुचाकी रस्त्याच्या साईटला लोखंडी संरक्षक गार्डवर आदळली. यामध्ये त्याच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने स्वामीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरक्षक सचिन हुंदळेकर, सहायक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

एस.टी बस सेवा सरु करण्याची मागणी

एस टी सेवा बंद असल्याने त्यांचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने शाळेत येत असतात. तरी शालेय विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान आणि जीवघेणे रस्ते अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लवकरच एस टी बसेस गावागावात सुरू करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:10 PM 21-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here