दापोली तालुक्यातील जालगाव सुतारकोंड येथील तरुणीवर शेजाऱ्यांनी किरकोळ वादातून कोयतीने वार केल्याची घटना दि. ५ मार्च रोजी सायंकाळी ८ वा. च्या सुमारास घडली असून संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जालगाव सुतारकोंड येथील मानसी महेश दवंडे ही तरुणी तिच्या घरातील वीज गेल्याने आपला मोबाईल शेजारील कृष्णा बटावळे यांच्याकडे सायंकाळी ७.४५ वा. च्या सुमारास चार्जिंग करण्यास गेली. थोड्या वेळाने मानसी शेजारीच असणाऱ्या आपल्या मैत्रीणीकडे जात असताना तिला कृष्णा बटावले यांची पत्नी कल्याणी बटावले हिने बोलावले व तू माझ्या घरातून मोबाईल नेलास तो आणून दे असे म्हटले. मात्र मानसीने मी मोबाईल घेतला नाही असे सांगितले. तेवढ्यात कृष्णा बटावले तिथे आला व त्याने मोबाईलबाबत विचारणा करून मानसी हिच्या कानशिलात मारले. या धडपडीत मानसीने कृष्णाला ढकलले, याचा राग येत त्याने मानसीवर कोयतीने वार केला.
