धान्य गोडाऊनमधील धान्याची उचल बंद; 20 हजार टन धान्य पडून; जिल्ह्यातील धान्य वितरण व्यवस्थेवर मोठा परिणाम

0

रत्नागिरी : जिल्ह्याला धान्यपुरवठा करणाऱ्या एफसीआय गोडावून मधून पंधरा ते वीस दिवस धान्याची उचल बंद आहे. याचा वितरण व्यवस्थेवर परिणाम झाला असून सुमारे २० हजार टन धान्याची उचल शिल्लक आहे. यामुळे जिल्ह्यातील धान्य पुरवठा व्यवस्था पुरती कोलमडली आहे. वाराईवरून (धान्य उचलीचा अधिकचा खर्च) ठेकेदार आणि हमाल यांच्यातील वाद टोकाला गेल्याने धान्य वाहतूक बंद आहे. जिल्हा प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

जिल्ह्यातील रास्त धान्य दुकानांना दर महिन्याला अपेक्षित धान्य पुरवठा व्हावा, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून एफसीआय (भारतीय धान्य मंडळाला) मागणी कळवली जाते. त्यानुसार एमआयडीसीतील एफसीआय गोदामात हे धान्य येते. तेथून हमालांच्या माध्यमातून हे धान्य तालुका स्तरावरील पुरवठा विभागाच्या गोदामात नेण्यात येते; मात्र एफसीआय गोदामामधून धान्य उचल करताना हमालांना वाराई दिली जाते; मात्र ती कोणी द्यायची हा मोठा प्रश्न आहे. ठेकेदाराने ही वाराई द्यावी, अशी हमालांची मागणी आहे.

मात्र ठेकेदार त्यासाठी तयार नाही. हमाल आपल्या मागणीवर ठाम असून वाराई नाही दिली तर आम्ही धान्य ट्रकच्या हौद्यापर्यंत आणून देऊ, ते ट्रकमध्ये भरणार नाही, अशी अट हमालांनी घातली आहे. वाराई कोणी द्यायचा हेच स्पष्ट होत नसल्याने या मागणीसाठी एफसीआय गोडावूनमधील हमालांनी धान्य उचल बंद केली आहे.

बंदचा जिल्ह्यातील धान्य वितरण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून सुमारे साडे आठशेपेक्षा अधिक रास्त धान्य दुकानांमध्ये धान्यच पोचलेले नाही. जिल्ह्यात साधारण साडेचार लाखांच्या दरम्यान शिधापत्रिकाधारक आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:52 AM 24-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here