भारतीय शास्त्रीय संगीतात मानसिक, आत्मिक व आध्यात्मिक आनंद देणारे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

0

मुंबई : संगीत, कला व साहित्य हा साधनेचा विषय आहे. शास्त्रीय संगीत समजण्यासाठी देखील थोडीफार साधना करावी लागते. बिगर शास्त्रीय गाण्यांनी काही काळ आनंद जरूर मिळतो, परंतु मानसिक, आत्मिक व आध्यात्मिक आनंद शास्त्रीय संगीतातच आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांचा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते दीनानाथ नाट्यगृह येथे बुधवारी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

हृदयेश आर्टतर्फे आयोजित या सत्कार सोहळ्याला पं हरिप्रसाद चौरसिया, माजी मंत्री विनोद तावडे, आमदार पराग अळवणी, माध्यमकर्मी राजीव खांडेकर व हृदयेश आर्टचे अध्यक्ष अविनाश प्रभावळकर प्रामुख्याने उपस्थित होते.

संगीत केवळ मौज मस्तीसाठी नसून मनुष्याला पशुत्व व भौतिकतेच्या वर उचलून परमात्म्याशी तादात्म्य साधण्यास सहाय्यक असे साधन असल्याचे सांगून प्रभाताईंच्या शिष्यांनी त्यांचा सांगीतिक वारसा पुढे न्यावा असे आवाहन राज्यपालांनी केले.

आपले आई वडील व गुरुजन आज हयात नसले तरीही श्रोते हाच आपला सांगीतिक परिवार असल्याचे सांगताना साधक आणि कलाकार या दोन्ही भूमिका आपण यशस्वीपणे पार पाडू शकलो याचा आनंद वाटत असल्याचे डॉ प्रभा अत्रे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

जीवन माझे सुरासंगती, अर्पियले मी रसिका तुजसी या ओळी उद्धृत करून डॉ प्रभा अत्रे यांनी श्रोते हाच आपला मोठा पुरस्कार असल्याचे यावेळी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:17 PM 24-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here