देवगड : देवगड आगारातून सुटणार्या काही एस.टी. फेर्या अचानक रद्द करण्यात येत असल्याने विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत असून त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच लांब पल्ल्याच्या काही फेर्या व्हाया रेल्वेस्टेशन केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत, आदी विविध समस्यांकडे लक्ष वेधत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व स्वाभिमान विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकार्यांनी आगार व्यवस्थापकांना धारेवर धरले. जोपर्यंत तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी येत नाही, तोपर्यंत आम्ही कार्यालयातच ठाण मांडू, असा आक्रमक पवित्रा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकार्यांनी घेतला. आगार व्यवस्थापकांनी यापुढे अचानक फेर्या रद्द केली जाणार नाहीत व कारभारात सुधारणा केली जाईल, असे आश्वासन दिले. देवगड आगारातून सुटणार्या शालेय व ग्रामीण फेर्या अचानक रद्द करण्याचे प्रमाण वाढले असून यामुळे विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत आहेत. याबाबत शुक्रवारी स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आगार व्यस्थापक हरेश चव्हाण यांना जाब विचारला. शुक्रवारी देवगड स्थानकातून दुपारी 12.30 वा.सुटणारी वरेरी फेरी अचानक रद्द केल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे व प्रवाशांचे हाल झाले.कोणतीही पूर्वकल्पना न देता फेर्या रद्द केल्या जात असल्याबद्दल नगराध्यक्ष सौ.प्रणाली माने, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, युवक तालुकाध्यक्ष वैभव करंगुटकर, विद्यार्थी संघटना सचिव सिध्देश माणगावकर यांनी आगारप्रमुखांना जाब विचारला. विधानसभा युवक अध्यक्ष अमित साटम, माजी उपनगराध्यक्ष संजय तारकर, बांधकाम सभापती निरज घाडी, नगरसेवक बापू जुवाटकर, नगरसेविका विशाखा पेडणेकर तसेच स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी संघटनेेचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावर आगार व्यवस्थापकांनी देवगड आगारातील 34 चालक-वाहकांची बदली झाल्याने वेळापत्रक कोलमडल्याचे सांगितले. या उत्तराने आक्रमक झालेल्या स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकार्यांनी बदली झालेल्या कर्मचार्यांचा जागी किती कर्मचारी आले? सध्या आगारात कर्मचार्यांची संख्या आवश्यक तेवढी नसताना 34 कर्मचार्यांची बदली कशी केली?, रत्नागिरी-देवगड ही फेरी व्हाया रेल्वेस्टेशन केल्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून याबाबतची मागणी कोणी केली होती? या फेरीमुळे फायदा होतो की तोटा होतो? अशा अनेक प्रश्नांच्या फैरी या पदाधिकार्यांनी श्री. चव्हाण यांच्यावर झाडल्या. कर्मचार्यांच्या बदलीमुळे इतर कर्मचार्यांवर ताण पडत आहे त्याला जबाबदार कोण? अचानक फेर्या का रद्द केल्या?अशा प्रश्नांचा भडीमार करीत या पदाधिकार्यांनी जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येवून आमच्या तक्रारींचे निरसन करीत नाहीत, तोपर्यंत येथेच ठाण मांडून बसणार, असा आक्रमक पवित्रा घेतला. आगार व्यवस्थापक चव्हाण यांनी यापुढे कारभारात सुधारणा करून विद्यार्थी व प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असे आश्वासन दिले. मात्र, कारभारात सुधारणा झाली नाहीतर आ. नितेश राणे यांच्यासमवेत बैठक घेवून पुढील पाऊल उचलले जाईल, असा इशारा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकार्यांनी दिला.
