रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात होळी पौर्णिमेनिमित्त खासगी आणि सार्वजनिक अशा एकूण ४ हजार २४६ ठिकाणी होळ्या पेटणार आहेत, तर एक हजार ग्रामदेवतांच्या पालख्या गृहभेटीसाठी जाणार आहेत. जिल्ह्यात गेल्या २८ फेब्रुवारी रोजी फाल्गुन शुद्ध पंचमी म्हणजेच फाक पंचमीला शिमगोत्सव सुरू झाला. आज (होळीपौर्णिमा) उत्सवाचा महत्त्वाचा दिवस आहे. जिल्ह्यात तीन हजार तीन ठिकाणी खासगी, एक हजार २४३ सार्वजनिक होळ्या उभ्या राहणार आहेत. त्यानंतर प्रथेनुसार गावागावांमध्ये चांदीचे मुखवटे घालून एक हजार ९५ ग्रामदेवतांच्या पालख्या भक्तांच्या गृहभेटीसाटी रवाना होणार आहेत. कोकणात गणेशोत्सवापाठोपाठ शिमगोत्सवालाही महत्त्व आहे. त्यासाठी दूरवर नोकरीधंद्यासाठी गेलेले चाकरमानी आपापल्या गावात दाखल होतात. यावर्षी सुमारे चार लाख चाकरमानी गावी आले असल्याचा अंदाज आहे. त्यांच्या उपस्थितीत उत्सव सुरू झाला आहे. उत्सवादरम्यान परंपरेनुसार संकासुराचा मार, गोमूचा नाच, विविध मुखवटे लावून फिरणारी सोंगे नाचविली जातात. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी/त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळी पेटविल्यानंतर ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यामध्ये चांदीची रुपे लावलेल्या देवीच्या उत्सवमूर्ती ठेवण्यात येत्ता. त्यानंतर ग्रामदेवतेची पालखी देवळातून सहाणेवर आणली जाते. त्यानंतर ती गृहभेटीसाठी रवाना होते. प्रथेनुसार गावातून फिरून ती पुन्हा मंदिरात आल्यानंतर शिमगोत्सवाची सांगता होते. शिमगोत्सवात जिल्ह्यात शिमगोत्सवावरून होणारे वाद सामोपचाराने मिटवण्यात पोलीस प्रशासनाने प्रयत्न केल्याने यावर्षी कोणत्याही गावात शिमगोत्सव साजरा करण्यावरून वाद राहिलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही गावात उत्सवावर बंदी आणलेली नाही, असे पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात पेटविल्या जाणार असलेल्या सार्वजनिक होळ्या, खासगी होळ्या आणि ग्रामदेवतांच्या पालख्यांची संख्या अशी – रत्नागिरी शहर – १६ सार्वजनिक होळ्या, १०७ खासगी होळ्या, १५ पालख्या. रत्नागिरी ग्रामीण – ७२, १३०, ६८. जयगड – ४५, १६६, २०. राजापूर – १०४, १४२, ६१. नाटे – १२, ४२, २३. लांजा – ९६, ११४, ९८. देवरूख – ९८, ७०, ९१. संगमेश्वर – ७९, १६८, ७९. चिपळूण – ९५, १७०, १२. गुहागर – ४६, २३०, ४६. सावर्डे – ४३, २५०, ४०. अलोरे – ३१, ३४५, ३१. खेड – १९९, ३४०, २१४. दापोली – १५०, ३७५, १५०. मंडणगड – ७३, १६२, ५५. बाणकोट – ३०, ७०, १३. पूर्णगड – ३०, ६५, ५५. दाभोळ – २४, ५७, २४.
