रत्नागिरी : आज दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास समुद्राला आलेल्या उधाणाने मिर्या बंधारा गिळंकृत केला आहे. या बंधाऱ्याला समुद्राच्या अजस्त्र लाटांनी अक्षरशः भगदाड पाडले. मिरकरवाडा बंदरात नव्याने बांधण्यात आलेल्या जेटीमुले समुद्राच्या अजस्त्र लाटा मिऱ्या गाव गिळंकृत करीत आहेत असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जिल्हाभरात पावसाने थैमान घातले आहे, जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आले आहेत. मिऱ्या गावाच्या संरक्षणासाठी बांधलेला हा बंधारा फोडून पाणी घरापर्यंत पोहोचल्यामुळे मिऱ्या गावामध्ये घबराटीचे वातावरण आहे. धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचा मोठा भाग या अजस्त्र लाटांनी गिळंकृत केला. बंधाऱ्याच्या पलिकडे असलेला डांबरी रस्ताही वाहून गेला असून पाणी वस्तीमध्ये शिरल्याने भीती निर्माण झाली होती. या ठिकाणी सरकारने पक्का संरक्षक बंधारा तज्ञांच्या सल्ल्यानुसार बांधल्यास धोक्यापासून संरक्षण मिळू शकेल असे म्हटले आहे. या बंधाऱ्यासाठी स्थानिकांनी अनेक वेळा आंदोलने केली आहेत. विशेष म्हणजे यंदाच कोट्यवधी रुपये खर्च करून आलावा ते पंधरामाड या गावांची समुद्राच्या लाटांमुळे होणारी धूप थांबवण्यासाठी हा बंधारा बांधण्यात आला. तसेच या बंधाऱ्यावर डांबरी रस्ताही तयार करण्यात आला. मात्र, लाटांच्या माऱ्यामुळे या बंधाऱ्याला दोन भगदाड पडले आहे. तसेच आता वस्तीच्या दिशेने लाटांचा मारा होत आहे. हा बंधारा पूर्णपणे फुटून पाणी कधीही मानवी वस्तीत घुसू शकते. त्यामुळे नागरीक भितीच्या छायेत वावरत आहेत. आज सकाळी हा बंधारा ढासळून दोन भली मोठी नारळाची झाडे देखील समुद्राने गिळंकृत केली आहेत. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घटन्स्थाली भेट देऊन माहिती घेतली आहे.
