वैभववाडी : अरुणा धरणाच्या उंबरठा पातळीपेक्षा जास्त पाणीसाठा झाल्यानंतर सांडव्यातून अतिरिक्त पाणी सोडण्यात येणार आहे.त्यामुळे नदीकाठच्या गावातील लोकांना जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अरुणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेले काही दिवस सतत पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने धरणाच्या उंबरठा पातळीपेक्षा जास्त पाणी पातळी झाल्यानंतर धरणाच्या सांडव्यातून कोणत्याही क्षणी पाण्याचा अनियंत्रित प्रवाह चालू होणार आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पाण्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या गावातील लोकांनी जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी नदीपात्रात उतरू नये व सावधानता बाळगावी, असा धोक्याचा इशारा पाटबंधारे विभागाने संबंधित गावांतील लोकांना दिला आहे.
