रत्नागिरीसह निम्मे राज्य आजपासून निर्बंधमुक्त

0

मुंबई : राज्यातील कोरोनाचा संसर्ग ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारपासून मुंबई, नागपूर, पुण्यासह निम्मे राज्य निर्बंधमुक्त होणार आहे. राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यांतील निर्बंध मागे घेण्यात येणार आहेत. त्यानुसार उपाहारगृहे, चित्रपट व नाटय़गृहे आदी पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मुभा दिली जाईल.

राज्यात यापूर्वीच १ फेब्रुवारीपासून सर्व राष्ट्रीय उद्याने, सफारी, पर्यटन स्थळे, स्पा, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, नाटय़गृह, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच लग्नसमारंभासाठी दोनशे तर अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवरील निर्बंध रद्द करण्यात आले आहेत. मात्र अजूनही राज्यात ब्युटी सलून तसेच केशकर्तनालय, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, वॉटर पार्क, उपाहारगृहे, नाटय़गृहे, चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचे बंधन आहे. मात्र गेल्या महिनाभरात राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने कमी होत असून रविवारी आतापर्यंतची सर्वात कमी अशी ४०७ रुग्णांची नोंद झाली.

राज्यात सध्या केवळ सहा- साडेसहा हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे करोनाची लाट ओसरल्याने निर्बंध शिथिल करावेत या केंद्र सरकारच्या सूचनेनुसार बुधवारपासून राज्यातील निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून उद्या उच्च न्यायालयात निर्बंध शिथिलतेची अधिसूचना सादर केली जाणार आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, ठाणे, गोंदिया, चंद्रपूर, सांगली, पालघर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, भंडारा, वर्धा या जिल्ह्यांतील लसीकरण ७० टक्क्यांपेक्षा (दुसरी मात्रा) अधिक असल्याने तेथील निर्बंध मागे घेण्यात येतील. मात्र एखाद्या जिल्ह्यात अजूनही अधिक प्रमाणात करोनाबाधित आढळत असल्यास तेथे निर्बंध ठेवण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनास देण्यात येणार असल्याचे समजते. उपनगरीय रेल्वेत लसीकरण न झालेल्यांनाही प्रवासाची मुभा देण्याबाबत सरकारने तज्ज्ञांशी चर्चा केली असून त्याबाबतचा निर्णय उद्या न्यायलयात होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या लसीकरणाच्या सरासरीपेक्षा म्हणजेच ७० टक्केपेक्षा अधिक लसीकरण (दुसरी मात्रा) झालेल्या जिल्हयातील बहुतांश सर्वच निर्बंध हटविण्यात येणार आहेत.

कोरोनाची साथ सुरू होताच मार्च २०२० मध्ये राज्यातील शाळांमधील प्रत्यक्ष शिक्षण बंद होऊन दृकश्राव्य माध्यमातून वर्ग सुरू झाले. त्यानंतर परिस्थिती थोडी निवळली की शाळा काही निर्बंधांसह सुरू करायच्या आणि रुग्ण वाढू लागले की पुन्हा बंद करायच्या असेच दोन वर्षे सुरू होते. प्रत्यक्ष वर्ग भरण्यास सुरुवात झाली तेव्हाची पन्नास टक्केच उपस्थितीची अट घालण्यात आली होती. त्याचबरोबर खेळ, उपक्रम, परिपाठ घेण्यास बंदी होती. आता मात्र करोनापूर्वीच्या वेळापत्रकानुसार शाळांमध्ये उपक्रम सुरू होणार आहेत. शाळांमधील उपस्थितीही शंभर टक्के करण्यास म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना एकावेळी शाळेत बोलावण्यास परवानगी देण्यात आली आहे. शाळा बंद झाल्यापासून एकदाही पूर्वप्राथमिकचे वर्ग पूर्णवेळ सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. आता बुधवारपासून पूर्वप्राथमिकचे वर्गही भरणार आहेत.

शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी मिळाली असली तरी प्रत्यक्षात अनेक शाळांना आठवडाभरच पूर्णवेळ शाळा सुरू ठेवणे शक्य होणार आहे. ४ मार्चपासून बारावीच्या तर १० मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. यंदा प्रत्येक शाळेत परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षेच्या वेळा टाळून शाळा भरवाव्या लागणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:30 AM 02-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here