…म्हणून मी नीलला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करायला सांगितला : किरीट सोमय्या

0

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या याला अटक होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. विशेष म्हणजे किरीट सोमय्या यांनी माझ्यावर कोणत्याही यंत्रणेने गुन्हा दाखल केल्यास मी चौकशीला सामोरे जाईन, असे म्हटले होते. मी त्यावर अपीलही करणार नाही, असे सांगत किरीट सोमय्या यांनी शिवसेनेविरोधात दंड थोपटले होते. मात्र, आता किरीट सोमय्या यांच्या मुलाने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज का केला होता, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला होता. त्यावर किरीट सोमय्या यांनी बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले.

मला ठाकरे सरकार आणि संजय राऊत यांचे कपडे उतरावयचे होते, त्यांना उघडे पाडायचे होते. त्यासाठीच मी नीलला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करायला सांगितल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले. नील सोमय्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला नसता तर त्याच्याविरोधात तक्रार किंवा गुन्हा नाही, ही माहिती पुढे आलीच नसती, असे सोमय्यांनी सांगितले.

अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी मुंबई पोलिसांनी दिलेले स्पष्टीकरण संजय राऊत आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पाहावे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी नील सोमय्या याच्याविरोधात कोणतीही तक्रार, गुन्ह्याची नोंद किंवा पुरावे नसल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. त्यांनी एकप्रकारे ठाकरे सरकारचे कपडेच उतरवले आहेत. संजय राऊत इतक्या दिवसांपासून माझ्याविरोधात आरोप करत आहेत. मग त्याची कागदपत्रं आणि पुरावे कुठे गेले? संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही काही कागदपत्रं दाखवली होती, त्याचं काय झालं? तेव्हा रश्मी ठाकरे यांच्या १९ बंगल्यांचा मुद्दा उकरून काढण्यावरून उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची लाज काढली का, असा सवालही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सरकारवर कंट्रोल राहिलेला नाही. अधिकाऱ्यांवरून त्यांचा विश्वास उडालेला आहे, अशी टिप्पणीही किरीट सोमय्या यांनी केली.

संजय राऊत यांचा सोमय्या पिता-पुत्रांना इशारा

किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांनी गैरव्यवाहर केला नाही तर मग अटकपूर्व जामिनासाठी त्यांची इतकी पळापळ का सुरु आहे. कोणत्या गुन्ह्याखाली त्यांना अटक होणार, याची स्पष्टताच नाही. मग अटकपूर्व जामिनासाठी ते धावाधाव का करत आहेत, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच आगामी काळात बाप-बेटे आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणारे भाजपचे नेते निश्चितच तुरुंगात जातील. माझे हे शब्द लक्षात ठेवा, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:02 PM 02-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here