फायनलच्या पराभवाने रडणाऱ्या शेफालीला स्म्रीती मंधनाने दिला अनोखा संदेश

0

काल(8 मार्च) महिला टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 85 धावांनी पराभव केला आणि पाचव्यांदा टी२० विश्वचषकाच्या विजेतेपदावर नाव कोरले. या पराभवानंतर भारताची स्टार फलंदाज स्म्रीती मंधना म्हणाली, ही आत्मपरिक्षणाची वेळ आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एलिसा हिली(75) आणि बेथ मूनी(78*) यांनी केलेल्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 4 बाद 184 धावा केल्या आणि भारताला 185 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 19.1 षटकातच 99 धावांवर संपुष्टात आला होता. या पराभवानंतर मंधना म्हणाली, ‘ही आत्मपरिक्षणाची वेळ आहे. अपयश तुम्हाला यशापेक्षाही जास्त शिकवण देते. संघाला सध्या एकटे सोडा आणि विचार करा की आम्ही पुढील काही वर्षात कशी चांगली कामगिरी करु शकतो.’ त्याचबरोबर वनडे आणि टी20 या दोन्ही प्रकारात भारतीय महिला संघाने चांगली कामगिरी करण्याचे श्रेय मंधनाने संघाचे प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमण यांना दिले आहे. ती म्हणाली, ‘टी20 प्रकारात आमची कामगिरी चांगली होत नव्हती. पण वनडेमध्ये आम्ही नक्कीच यापेक्षा चांगले होतो. आता आम्ही प्रत्येक क्रिकेट प्रकार तितकेच चांगले खेळत आहोत. प्रशिक्षकांनी आम्हाला यात खूप मदत केली आहे आणि आम्ही बर्‍यापैकी सुधारत आहोत.’ ‘युवा खेळाडूंच्या आगमनाने बरेच बदल झाले आहेत आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे संघाची कामगिरी. रमण सरांनी केवळ एक-दोन खेळाडूंची कामगिरी सुधारली नाही तर संपूर्ण संघही विकसित केला आहे. आज जे झाले ते चांगले झाले नाही, पण आम्ही एक संघ म्हणून परिपक्व झालो आहोत.’ त्याचबरोबर भारतीय संघ अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर 16 वर्षीय शेफाली वर्मा रडताना दिसून आली होती. यावेळी भारतीय संघातील खेळाडू समजावतानाही दिसल्या. यावेळी मंधनाने शेफालीला तिच्या कामगिरीबद्दल अभिमान बाळग असे सांगितले. मंधना म्हणाली, ‘शेफाली आणि मी आमचे पदक स्विकारताना एकत्रच उभे होतो. ती त्यावेळी रडत होती. त्यावेळी मी तीला सांगितले की तिने ज्याप्रकारे या संपूर्ण स्पर्धेत कामगिरी केली त्याबद्दल तिने अभिमान बाळगायला पाहिजे. जेव्हा मी 16 व्या वर्षी माझा पहिला विश्वचषक खेळले तेव्हा मी तिच्याप्रमाणे 20 टक्केही चेंडूला हीट करु शकत नव्हते.’ ‘ती ज्याप्रकारे खेळली त्याचा तिला अभिमान वाटला पाहिजे, पण ती जशी बाद त्यामुळे निराश झाली. ती आत्तापासूनच विचार करत आहे की ती कशी सुधारणा करु शकते. तिला एकटे सोडले पाहिजे, हेच मी तिला सांगू शकते.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here