तिलारी-रामघाटात दोन ठिकाणी दरडी कोसळल्याने संपूर्ण घाटरस्ता बंद

0

साटेली-भेडशीः गेल्या चार दिवसांपासून दोडामार्ग तालुक्यात पावसाने जोर धरला असून यामुळे जनजीवन विस्कळीत  झाले आहे.  या मुसळधार व सतंतधार पावसामुळे  तिलारी-रामघाटात  शुक्रवारी दोन ठिकाणी दरडी कोसळल्याने संपूर्ण घाटरस्ता बंद होवून रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. दरडीबरोबर मोठे खडक व वृक्ष रस्त्यावर आले असल्याने या दरडी हटविण्यास विलंब होत आहे. या दोन दरडी दरम्यान काही वाहने अडकून पडली आहेत. केंद्रे  विद्युतनिर्मिती केंद्राचे  कर्मचारी यात  अडकून पडले आहेत. गेल्या जून महिन्यात  हा घाट रस्ता खचून वाहून गेल्याने त्याठिकाणी दरी निर्माण झाली होती. त्यामुळे बांधकाम विभागाने रस्ता वाहतुकीसाठी  पूर्णपणे बंद केला होता. जरी हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला असला तरी खासगी वाहतूक करणार्‍या वाहनचालकांनी खचलेल्या ठिकाणी माती काहीशी बाजुला करुन  वाहतूक करत होते.   परंतु बांधकाम विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर सा. बां. विभागाकडून  हा घाटरस्ता 18ऑगस्टपासून सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु ढगफुटीसारखा पाऊस कोसळल्याने पुन्हा एकदा दरडी कोसळल्या. त्यामुळे आता रस्ता वाहतुकीस खुला कसा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून आणखी काही दरडी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे हा घाट रस्ता अतिशय धोकादायक बनला आहे. दरडी कोसळल्याची माहिती बांधकाम विभाग तसेच आपत्ती व्यस्थापन विभागाला देवून देखील संध्याकाळी उशिरापर्यंत त्याठिकाणी कोणीच पोहचले नाही. त्यामुळे विद्युत मंडळाचे कर्मचारी तसेच वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेले पत्रकार देखील त्याठिकाणी अडकू पडले. त्यांना उशिरा केंद्रे येथील ग्रामस्थांनी कोसळलेल्या दरडीच्या बाजूने वाट करत  बाहेर काढले. वाहतूक सुरू असताना एखाद्या वाहनावर  दरड कोसळली असती  तर जबाबदार कोण? असा प्रश्‍न  उपस्थित केला जात आहे. या रस्त्याची पुन्हा एकदा दुरावस्था झाल्याने गणेशोत्सवापूर्वी घाट रस्ता पूर्वरत होणार की नाही याकडे  वाहनचालक, व्यापारी व प्रवाशांच लक्ष लागून राहिले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here