चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे शिमगोत्सवाची वेगळी प्रथा आहे. येथे चक्क पेटते निखारे एकमेकांवर मारले जातात. या खेळात मानपानाप्रमाणे गावातील दोन गट परस्परांसमोर उभे राहून लाकडे पेटवतात. नंतर ढोल-ताशांच्या गजरात आरोळ्या ठोकत सुमारे तीस फुटाच्या अंतरावरून ती पेटती लाकडे (होलटे) पाच वेळा एकमेकांवर फेकतात. मात्र ही जळती लाकडे अंगावर पडून कोणीही जखमी किंवा भाजत नाही. शेवटी उरलेली लाकडे एकत्र करून त्यांची होळी केली जाते. ही प्रथा अंगावर शहारे आणणारी आहे. होलटा शिमगा असे या प्रथेचे नाव आहे. होलटे शिमग्याने अक्षरशः थरकाप उडतो. काल रात्री दि. ०९ मार्चला सोमवारी रात्री हा शिमगोत्सव चांदण्याच्या पिठूर प्रकाशात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या होलटे होम होळीचे काही नियम आहेत. दोन गट एक मेकांसमोर उभे राहतात. लहान मोठे यांच्या हातात जळका होलटा म्हणजे लाकूड असते. प्रत्येक वाडीतली मुले या खेळात सहभागी होतात. ढोल-ताशा आणि सनईच्या वादनात होलटे खेळणार्या खेळाडूंच स्वागत होते. पायात चप्पल न घालता एकमेकांवर हे होलटे फेकले जातात. वाईट इच्छा किंवा मद्यपान केलेल्या व्यक्तीच्याच माथी हे पेटते लाकूड पडते आणि त्याला शिक्षा मिळते, असा या प्रथेतील समज आहे. त्यामुळे अनेक चाकरमानीसुद्धा हा खेळ खेळण्यासाठी येतात.
