ई-पीक नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ

0

रत्नागिरी : ई-पीक नोंदणीसाठी शासनाकडून तिसर्‍यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकरी आता 15 मार्चपर्यंत मोबाईल अ‍ॅपद्वारे स्वतःच पीक नोंदणी करू शकतात.

ई-पीक पाहणी मोबाईल अ‍ॅपच्या साहाय्याने सर्व खातेदार शेतकरी तलाठ्याकडे न जाता आपल्या स्वतः च्या मोबाईलवरून आपल्या 7/12 वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई-पीक नोंदणी प्रकल्प हा 15 ऑगस्टपासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या अ‍ॅपद्वारे आतापर्यंत सुमारे 1 कोटीपेक्षा अधिक शेतकर्‍यांनी ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे आपल्या पिकांची नोंदणी केली आहे.

रब्बी हंगामाच्या पीक पाहणीच्या नोंदीसाठी ई-पीक पाहणीचे हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. सर्व खातेदार शेतकरी यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. रब्बी हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अ‍ॅपद्वारे पीक नोंदणी करण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती.

राज्याच्या काही भागांत कोरोना महामारी व उशिराच्या मान्सूनमुळे शेतकर्‍यांना पीक नोंदणी पूर्ण करता आली नाही. याचा विचार करून जमावबंदी आयुक्त यांच्या मान्यतेने ई-पीक पाहणी मोबाईल अ‍ॅपद्वारे शेतकरीस्तरावरील पीक पाहणीची मुदत 15 मार्च 2022 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व शेतकर्‍यांनी रब्बी हंगाम 2022 ची पीक पाहणी वाढीव मुदतीत 15 मार्चपर्यंत नोंदविण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:22 PM 07-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here