वाहतूक करणे धोकादायक; एसटी प्रशासनाने दिला अहवाल

0

रत्नागिरी : जिल्हा परिषदेकडे असणार्‍या ग्रामीण रस्त्यांची अवस्था सध्या बिकट बनली आहे. शासनसुद्धा निधी कमी देत असल्याने ही अवस्था बनली आहे. एकूण 113 मार्ग वाहतुकीसाठी डेंजर झोनमध्ये आहेत. या मार्गांवरून एसटी फेर्‍या केव्हाही बंद पडू शकतात. तसा अहवाल एसटी प्रशासनाने जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाला दिला आहे. जिल्हा परिषदेकडे सुमारे 6 हजार कि.मी. लांबीचे रस्ते देखभाल व दुरूस्तीसाठी आहेत. कोकणात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने रस्ते खराब होण्याची प्रक्रिया लगेच होते. जिल्ह्यात साधारण साडेतीन हजार मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडतो. अनेक वेळा अतिवृष्टी झाल्याने रस्ते वाहून जाण्याचे प्रकारही घडतात. शासन जि.प.ला हात राखूनच निधी देते. वास्तविक जिल्ह्याची नैसर्गिक स्थिती बघून निधी जास्त देण्याची गरज आहे. मात्र, तसे होत नाही. त्यामुळे जि.प.च्या रस्त्यांची अवस्था फारच बिकट बनली आहे. चालू वर्षी आतापर्यंत अनेक वेळा अतिवृष्टी झाली आहे. यामुळे काही ठिकाणी मोरी खचणे, मोठमोठे खड्डे पडणे आदी प्रकार घडले आहेत. यामुळे अशा रस्त्यांवरून वाहतूक करणे सध्या धोकादायक बनले आहे. एसटी प्रशासनाने या महिन्यात रस्त्यांबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला दिलेला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मालकीचे 113 रस्ते वाहतुकीसाठी अत्यंत खराब आहेत. यामुळे या रस्त्यांवरच्या एसटी फेर्‍या बंद होण्याची शक्यता आहे, असे या अहवालात म्हटले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रत्नागिरी तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बिकट बनली आहे. एकूण 24 मार्ग खराब झाले आहेत. त्यानंतर संगमेश्‍वर तालुक्यातील रस्त्यांचा नंबर लागतो. येथील 20 मार्ग धोकादायक बनले आहेत. जिल्ह्यातील 113 मार्गाची लवकरात लवकर दुरूस्ती करणे गरजेचे आहे. शासनाने यासाठी निधी द्यावा अशी मागणी जिल्हा परिषदेने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here