जामदा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही : खासदार विनायक राऊत

0

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील जामदा मध्यम प्रकल्पाचे काम अर्ध्यावर आले तरी पुनर्वसन शून्य टक्के झाले आहे. या पुनर्वसनापासून एकही कुटुंब वंचित राहता कामा नये. यापुढे जामदा प्रकल्पातील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाला प्राधान्य दिले जाणार असून या कामात प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

गेली पंचवीस वर्षे केवळ प्रकल्पाच्या बांधकामाकडेच लक्ष दिले गेले. आज झालेल्या बैठकीतून खऱ्या अर्थाने पुनर्वसनाचा श्रीगणेशा सुरु झाला आहे. दोन महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली असून या मुदतीत आम्ही पुनर्वसनाचे काम सुरु करू, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जामदा मध्यम प्रकल्प पुनर्वसनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, पाटबंधारे विभागाच्या अधिक्षक अभियंता वैशाली नारकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जामदा प्रकल्पाबाबतची सद्यस्थिती खासदार विनायक राऊत यांनी जाणून घेतली. आतापर्यंत जामदा प्रकल्पासाठी 497 कोटी रुपयांचा निधी आला आहे. मात्र ग्रामस्थांच्या पुनर्वसनावर शून्य टक्के निधी खर्च करण्यात आला आहे. ही गंभीर बाब असल्याचे खासदार राऊत म्हणाले.

पुनर्वसनाकडे दुर्लक्ष केलेला हा एकमेव प्रकल्प असेल असे यांनी सांगितले. ते म्हणाले की, मी स्वतः प्रकल्पस्थळी जाऊन पाहणी केली त्यानंतर या पुनर्वसनाच्या विषयाला वेग आला आहे. आपण 640 लोकसंख्या पकडून काम करत होतात, ती संख्या 1100 वर पोहोचली आहे. आता जो निधी आला आहे. या निधीतून पुनर्वसनाला प्राधान्य द्या, अशी सूचना त्यांनी केली. झाडे आणि फळझाडांच्या पुढील आठ दिवसात नोंदी करून घ्या अशा सूचना कृषी अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. त्याचबरोबर वनविभागानेही त्यांची कार्यवाही सुरू करावी. पुनर्वसनाच्या कामात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला.

जामदा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पुनर्वसनासाठी आलेल्या निधीमधून ठेकेदाराची बिले भागवण्यात आली असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी करताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या बैठकीतही आपण हा मुद्दा मांडला असल्याची आठवण करून दिली. पुनर्वसनाच्या कामासाठी दोन महिन्याचा अवधी निश्चित करण्यात आला आहे. या अवधीमध्ये ही कामे करण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला देण्यात आल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:10 PM 08-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here