आर्थिक गैरव्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग असल्याचे जबाब दर्शवितात; न्यायालयाचे निरीक्षण

0

मुंबई : सकृतदर्शनी आर्थिक गैरव्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग असल्याचे साक्षीदारांचे जबाब दर्शवितात, असे निरीक्षण विशेष पीएमएलए न्यायलयाने नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावताना नोंदविले.
या आदेशाची प्रत उपलब्ध झाली.

दाऊदच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप करत ईडीने नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली. मलिक यांना १२ दिवसांच्या ईडी कोठडीनंतर सोमवारी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी ईडीने त्यांच्या कोठडीचा आग्रह धरला नाही तरी त्यांनी मलिक तपासात सहकार्य करत नसल्याची तक्रार विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्या. आर. रोकडे यांच्याकडे केली.

‘तपास सुरु असताना काही साक्षीदारांचे जबाब न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले. त्याआधारे आरोपीला ७ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. साक्षीदारांच्या जबाबांवरून सकृतदर्शनी मलिक यांचा आर्थिक गैरव्यवहारात सहभाग होता,असे दिसते,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. ‘आरोपीने पहिल्या रिमांडला व अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले असल्याने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणे योग्य आहे,’ असे न्यायालयाने म्हटले.

अटक रद्द करा; अधिकारांचे उल्लंघन : मलिक यांची उच्च न्यायालयाला विनंती
ईडीने मलिक यांना बेकायदेशीरपणे अटक करून त्यांचा जीवन जगण्याचा व स्वातंत्र्याच्या अधिकारांचे उल्लंघन केले आहे. मलिक यांचा दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविकता मलिक आणि दाऊद यांचा काहीच संबंध नाही. तसेच ईडीने पीएमएलए कायदा पूर्वलक्षित प्रभावाने लागू करून मलिक यांना या कायद्याखाली अटक केली आहे. मात्र, हा कायदा पूर्वलक्षित प्रभावाने लागू होऊ शकतो की नाही, याबाबत स्पष्टता नाही, असा युक्तिवाद मलिक यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी केला. याचिकेवरील सुनावणी बुधवारी ठेवली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:42 PM 09-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here