‘मोदींना कोणीच टक्कर देऊ शकत नाही, कारण…’; निकाल येताच भाजप नेत्याचं मोठं विधान

0

मुंबई : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून पंजाब वगळता इतर सर्व ठिकाणी भाजपचा बोलबाला दिसत आहे. राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपनं पूर्ण बहुमत मिळवेल, असं चित्र आहे. या निकालामुळं भाजपचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. ‘निवडणूक प्रचाराच्या पहिल्या चार टप्प्यांत प्रत्यक्ष सभा झाल्या नाहीत. त्या झाल्या असत्या तर भाजप ३२५ च्या पुढं गेली असता. पहिल्या चार टप्प्यांत पंतप्रधान मोदी यांना सभा घेता आल्या नाहीत. तशा त्या कोणालाही घेता आल्या नाहीत, पण मोदींच्या सभांचा एक करिष्मा असतो. त्यांच्या सभा न झाल्यामुळं जागा थोड्या कमी दिसतायत. पण भाजप ३०० चा आकडा पार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘मोदींना कोणीच टक्कर देऊ शकत नाही. कारण ते विकासावर बोलतात. बाकीचे बोलघेवडे आहेत, असंही ते म्हणाले. ‘महाराष्ट्रात जेव्हा केव्हा निवडणुका होतील, त्यावेळी महाराष्ट्रात भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असा दावाही त्यांनी केला.

गोव्यात सत्तेसाठी भाजप पुन्हा एकदा तोडफोड करू शकतो. आमदारांना आमिष दाखवलं जाऊ शकतं, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज केलं होतं. त्याबाबत विचारलं असता चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना टोला हाणला. ‘गोव्याशी शिवसेनेचा काय संबंध? तिथं त्यांचे आमदार आहेत का?, असा सवाल करतानाच, ‘आज संजय राऊतांवर नकारात्मक बोलणं हे आनंदाच्या वातावरणात बरोबर नाही,’ असं पाटील म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी गोवा व यूपीमध्ये प्रचारसभा घेऊनही शिवसेनेला तिथं यश मिळालं नाही, याकडं लक्ष वेधलं असता, ‘संजय राऊतांना काहीच गमवायचं नाही. त्यामुळं ते स्वत:चं हसं करून घेतायत. पण उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंना भवितव्य आहे. त्यांनी स्वत:चं हसं करून घेऊ नये,’ असा सल्ला पाटील यांनी दिला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:16 PM 10-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here