देवेंद्र फडणवीसांना पोलिसांची नोटीस: भाजपनं उचलणार ‘हे’ मोठं पाऊल; दरेकरांची माहिती

0

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीमुळं भाजप आक्रमक झाला असून, त्याविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ भाजपचे कार्यकर्ते उद्या, रविवारी मुंबईतील बीकेसी परिसरात एकवटणार आहेत, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने ११ मार्चला नोटीस बजावली असून, चौकशीसाठी बीकेसी येथे बोलावले आहे, अशी माहिती आज देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिली. आपण उद्या बीकेसीत जाणार असून, या पोलीस बदली घोटाळ्याच्या तपासात योग्य ते उत्तर देऊ, असे फडणवीस यांनी सांगितले. त्याचवेळी मला याबाबत माहिती कशी मिळाली, कुठून मिळाली, याचे स्रोत सांगणे बंधनकारक नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मला विशेषाधिकार आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस यांना पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीनंतर भाजप आक्रमक झाला आहे. फडणवीसांना समर्थन देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते बीकेसीत शक्तिप्रदर्शन करणार आहेत, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं. ते म्हणाले की, पोलीस बदली घोटाळा प्रकरणात बीकेसीतील सायबर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. फडणवीस यांनी विधानसभेत सरकारी षडयंत्राचा पर्दाफाश केला. त्यामुळे हे महाविकास आघाडीचे सरकार हादरले आहे. महाविकास आघाडीचे नेतेही हादरून गेले आहेत. सरकार अडचणीत येत असल्याचे लक्षात आल्याने नेते सैरावैरा पळायला लागले आहेत. त्याला सामोरे जावे लागत असल्याने मग भाजपचं जे शक्तिस्थान, नेतृत्व आहे. त्याला हात घालता येतं का? देवेंद्र फडणवीस हे कुठल्याही घोटाळ्यात सामील नाहीत. कुठल्याही अनधिकृत गोष्टींमध्ये ते सापडू शकत नाहीत. अशा वेळी असं कुठलं तरी फुटकळ कारण देऊन नोटीस बजावली आहे. विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीसांचे विशेषाधिकार आहेत. तथापि देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. कायद्याचा सन्मान ते करत आहेत. त्यामुळे उद्या ते ११ वाजता रितसर जाऊन उत्तरे देतील. यानंतर येणाऱ्या काळात सूडभावना, षडयंत्र या सगळ्या गोष्टी समोर येतील, असेही दरेकर म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:32 PM 12-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here