चिपळूण : तिवरे धरण दुर्घटनेनंतर धरण म्हटले की, लोकांच्या पोटात भीतीचा गोळा येतो. अशीच काहीशी परिस्थिती तालुक्यातील मोरवणे येथील धरणाखालील लोकांची झाली आहे. धरणातून गळती लागल्याने तेथील ग्रामस्थ घाबरून गेले. मात्र, लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी धरणाला धोका नसल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर येथील लोक थोडे निर्धोक झाले आहेत. मात्र, पावसाळ्यानंतर या धरणाची शासनाला दुरूस्ती करावीच लागणार आहे. धरण बांधताना अलिकडच्या काळात धरण क्षेत्रातील लोकांचे आधी पुनर्वसन करणे कायद्याने बंधनकारक झाले आहे. त्यानंतरच धरण बांधकाम करणे क्रमप्राप्त आहे. मात्र, 1980 च्या दशकातील धरणांचा अभ्यास केल्यास धरणाच्या भिंतीखालील बाजूस अनेक वस्त्या आजही गुजराण करीत आहेत. डोक्यावर टांगती तलवार ठेवून येथील ग्रामस्थ आपले जीवन कंठत आहेत. अशीच काहीशी परिस्थिती मोरवणे येथील धरणग्रस्तांची आहे. मोरवणे धरणाच्या भिंतीच्या खालच्या बाजूस बौद्धवाडी, चर्मकारवाडी, खालची मराठवाडी, ऐतिहासीक दळवटणे गाव, नलावडेवाडी व भुवडवाडी येथील ग्रामस्थांची वस्ती आहे. धरणानंतर आजतागायत या लोकांच्या स्थलांतराबाबत कोणताही विचार शासनाने केलेला नाही. धरणाला गळती लागल्यानंतर बौद्धवाडी व चर्मकार वाडीतील लोक भीतीने जागे झाले. अतिवृष्टीमध्ये काही रात्र त्यांनी जागून काढल्या. यानंतर मात्र लघु पाटबंधारे विभाग खडबडून जागा झाला व त्यांनी सातत्याने या धरणाला भेटी दिल्या व धरणाची अवस्था पाहिली. धरणाच्या भिंतीवर वाढलेली झाडेझुडपे ग्रामस्थांच्या आक्षेपानंतर तोडण्यात आली आणि ज्यावेळी धरण पाण्याने भरले त्यावेळी आऊटलेटमधून पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन धरणाच्या भिंतीवरील दाब कमी करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे सद्यस्थितीत या धरणाचा धोका टळला असला तरी येत्या उन्हाळ्यात धरणाची दुरूस्ती करणे अत्यावश्यक ठरणार आहे. मोरवणे धरणाला 1983 मध्ये मंजुरी मिळाली. 73 लाख रूपये अंदाजित रक्कमेतून धरण बांधण्याचा निर्णय झाला. 420 मी. धरणाची भिंत, 75 मीटरचा सांडवा आणि 24.37 मीटरची उंची असे हे मातीचे धरण आहे. हे धरण 2006 मध्ये पूर्ण करण्यात आले. या धरणामध्ये सध्या 3.841 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. म्हणजेच हे धरण तिवरे धरणाच्या तीनपटीने मोठे आहे. त्यामुळे त्याची सुरक्षितता महत्त्वाची ठरणार आहे. धरणासाठी डावा कालवा असून तो 5.40 कि.मी. लांब आहे. धरणाला उजवा कालवा नाही. धरणाचे लाभ क्षेत्र 286 हे. असून तालुक्यातील मोरवणे, दळवटणे या गावातील लोकांना याचा फायदा होतो. या कालव्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. आगामी काळात या धरणाचे पाणी बंद नलिकेतून वितरित करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी लघु पाटबंधारे विभागाने सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. मोरवणे धरण 1 जानेवारी 2018 रोजी सिंचन व्यवस्थापनकडे पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग यांच्याकडून रत्नागिरी पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित झाले आहे. अधिकार्यांनी केलेल्या पाहणीअंती सध्या हे धरण सुस्थितीत आहे, असे सांगण्यात येत आहे. मात्र, मोरवणे बौद्धवाडी ग्रामस्थांचा त्यावर आक्षेप आहे. 2005 मध्ये या धरणाच्या सांडव्याजवळील काही भाग कोसळला होता. त्याची दुरूस्ती करण्यात आली. या शिवाय धरणाच्या जॅकवेल जवळच्या भिंतीवरील पिचींगदेखील खचले होते. ते दुरूस्त करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने धरणाच्या जवळ डबर टाकला. मात्र, आजतागायत हे काम झालेले नाही.धरणाच्या भिंतीला पिचींग करणे आवश्यक असून या बाबत लघु पाटबंधारे विभागाने तत्काळ कार्यवाही करणे गरजेचे आहे.मोरवणे धरणाला अनेक दिवस गळती आहे. मात्र, तिवरेतील दुर्घटनेनंतर धरणाच्या भिंतीलगत असणारी बौद्धवाडीमध्ये घबराट निर्माण झाली. काही दिवस त्यांनी रात्री जागूनही काढल्या. यानंतर धरणाच्या आऊटलेटमधून कालव्याद्वारे वाशिष्ठी नदीला पाणी सोडण्यात आले. हा तात्पुरता उपाय झाला असून भविष्यातील धोका लक्षात घेऊन लघु पाटबंधारे विभागाने गळतीचे कारण शोधून काढले पाहिजे व त्यावर उपाययोजना करावी अशी मागणी येथील सरपंच मुकुंद चव्हाण, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप चव्हाण यांनी केली आहे. मात्र, सद्यस्थितीत पाटबंधारे विभागाने धरणाला धोका नाही असे लेखी हमी पत्र ग्रामस्थांना दिल्याने येथील लोक शासनावर विश्वास ठेवून आहेत.
