स्वतःच गिऱ्हाईक बनून पोलिसांनी कोकेन विकणाऱ्या टोळीला सापळ्यात पकडले

0

रत्नागिरी : कोकेनसारख्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थाचा जिल्ह्यात शिरकाव नको म्हणून पोलिसांनीच गि-हाईक होऊन सापळा रचूनच ही साखळी उद्ध्वस्त केल्याचे समजते. हरियानातील कोकेनची रत्नागिरीत हातोहात विक्री होणार हे कोस्टगार्डमधील रामचंद्र मलिक, सुनीलकुमार नरेंद्रकुमार रणवा यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हे डील केले. पोलिसांना कुणकुण लागताच ५० लाखांच्या बनावट नोटांचा वापर करून साखळीतील एक-एक कडी तोडली. काल आणखी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या एका कर्मचा-याला रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची टीप मिळाली होती. कोस्टगार्डमधील रामचंद्र मलिक, सुनीलकुमार रणवा हे दोघे  भारतीय हवाई दलातील कर्मचारी मुकेश शेरान याच्या संपर्कात होते. मुकेशने कोकेन विक्रीसाठी ५० लाखांचे गि-हाईक शोधण्याची जबाबदारी दोन्ही कोस्टगार्ड कर्मचा-यांकडे दिली होती. दोन वर्षे रत्नागिरी सेवेत असलेले रामचंद्र, सुनीलकुमार यांचा काही स्थानिकांशी संपर्क होता. त्यांच्यामार्फत ग्राहकाचा शोध सुरू होता. यातूनच पोलिसांच्या खबऱ्याने टीप दिली. पोलिसांनी स्वतःच गि-हाईक बनून छापा टाकण्याचा प्लॅन तयार केला. कोकेन खरेदीसाठी ५० लाखांच्या बनावट नोटांची बंडले तयार ठेवली. ती एका बॅगेत भरून पोलिस एमआयडीसी येथील पडक्या इमारतीत पोहोचले. त्यापूर्वीच रामचंद्र,  सुनीलकुमार, दिनेश सिंग हे तिघे कोकेन घेऊन तेथे थांबले होते. दहा ते पंधरा मिनिटे चर्चा झाल्यानंतर त्यांनी रोकड दाखविण्याचा इशारा केला. पोलिसांनी बॅगेतील ५० लाखांची रोकड दाखविल्यानंतर लपवून ठेवलेले कोकेन घेऊन दिनेश सिंग पोलिसांसमोर आला. त्याचक्षणी त्या तिघांना पोलिसांनी झडप टाकून ताब्यात घेतले. राजस्थान येथून अंकित सिंग याने दिनेश सिंग यांच्यामार्फत कोकेन रत्नागिरीत पाठविले. तर अंकितला कोकेन देणा-या तरुणाला ग्रामीण पोलिसांनी काल अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात एकूण सहा आरोपी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here